गुरुवार, २८ जुलै, २०१६

बेरोजगारांना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात यावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



          बीड, दि. 28 :- बीड जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि बाजारपेठेतील गरजा लक्षात घेऊन हमखास रोजगार निर्माण करणाऱ्या व्यवसाय - उद्योग धंद्यांचे कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण बेरोजगार युवक-युवतींना उपलब्ध करुन द्यावे अशी सुचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
          स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या माध्यमातून बीड येथे चालविण्यात येणाऱ्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण कार्याचा  सविस्तर आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील युवक-युवतींना केवळ प्रशिक्षणच उपलब्ध न करुन देता त्यांना रोजगार मिळविण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन व बँकामार्फत वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. प्रशिक्षण संस्थेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील 2  हजार 200 युवक-युवतींना व्यवसायासाठी प्रशिक्षित केले असून हे कार्य कौतुकास्पद आहे मात्र प्रशिक्षीत प्रत्येक बेरोजगार युवकाने रोजगार सुरु करुन स्वावलंबी झाल्याची माहिती संकलित केली पाहिजे. त्यांना रोजगाराभिमूख करण्याची संस्थेने जबाबदारी उचलली पाहिजे असेही जिल्हाधिकारी राम यावेळी म्हणाले.
          रोजगार-व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी प्रशिक्षण सत्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन जिल्हाधिकारी राम यांनी संस्थेच्या इमारतीसाठी शासकीय जमिन उपलब्ध करुन देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी पूर्ण करावी अशी सुचनाही केली. यावेळी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते करण्यात आले.

          प्रारंभी संस्थेचे संचालक एम.पी.वाघमारे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे अधिकारी दिपक कुमार आणि निकम आदि अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा