शनिवार, ३० जुलै, २०१६

सुशिक्षीत बेरोजगारांनी प्रशिक्षणातून व्यवसाय कौशल्य आत्मसात करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



          बीड, दि. 30 :- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारांनी व्यवसाय कौशल्य आत्मसात करुन स्वावलंबी व्हावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 30 दिवसीय कॉम्प्युटर बेसिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गंगाधर बोकाडे, विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एम.पी.वाघमारे, प्रशिक्षक सय्यद चाँद यांची प्रमुख उपस्थिती होती.
          पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.राम म्हणाले की, जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या खुप जास्त असून केवळ शिक्षण न घेता प्रशिक्षण घेण्यावर युवकांनी भर द्यायला हवा. जेणेकरुन व्यवसायाचे कौशल्य आत्मसात केल्यावर कोणताही व्यवसाय सहज करता येईल. शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन वेगवेळ्या गोष्टी आहेत. शिक्षण महत्वाचे असून प्रशिक्षणही तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे उमेदवारांनी प्रशिक्षण घेऊन कौशल्य प्राप्त करावे. सामान्य माणसात व कौशल्ययुक्त माणसात खुप मोठा फरक आहे. आरसेटीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा लाभ प्रत्येक बेरोजगारांने घेतला पाहीजे. देव स्वत: कुणाचीही मदत करत नसतो जो स्वत:ची मदत स्वत: करतो तोच यशस्वी होत असतो. कोणताही व्यक्ती त्याला संधी मिळाली तर तो यशस्वी होत असतो यामुळे आपण आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपुर उपयोग करुन घ्यायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          प्रशिक्षीत उमेदवारांनी संकटाची भिती बाळगू नये यशस्वी होण्यासाठी संकटांना तोड द्यायला पाहिजे तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी होऊ शकता असे सांगून आरसेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याचा डाटाबेस तयार करुन भविष्यात ते काय करतात याची माहिती ठेवावी अशी सुचनाही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केली.
          जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.बोकाडे यांनी बेरोजगारांसाठी बँकेकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजनाची सविस्तर माहिती  यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरसेटीच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देण्यात येते असे सांगून आरसेटीचे कार्य व उद्देश संचालक एम.पी. वाघमारे यांनी यावेळी विशद केला. यावेळी दत्ता रडे, किशोर मगर, आलम खान, श्रीमती रेखा शिंदे या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद पाटोळे यांनी केले तर आभार एस.ए.बोचकुरे यांनी मानले. या कार्यक्रमास आरसेटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासह प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा