बुधवार, २७ जुलै, २०१६

पिक विमा आणि कर्ज वाटपाचा आढावा शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा सज्ज - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



          बीड, दि. 27 :- बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी  पुढाकार घ्यावा. आजपासून जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा पिक विमा भरुन घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
          खरीप हंगामातील पिक विमा व पिक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, कृषी विभागाचे उपसंचालक बी.एम. गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे आणि विजय चव्हाण व इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
          जिल्ह्यातील पिक विमा भरण्याची कार्यवाही 31 जुलै पर्यंत सुरु राहणार असून यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना महत्वपूर्ण सूचना या बैठकीत देऊन जिल्हाधिकारी राम यांनी  सर्व बँकांनी शेतकऱ्यांचा विमा मुदतीत भरुन घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पिक विम्यासंदर्भात  काही संभ्रम होते. आता विम्यासंदर्भात  मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता संभ्रम राहणार नाहीत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी यशस्वी चर्चा करण्यात आली असून त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आजपासून त्यांच्या सर्व शाखा पिक विम्याचा स्विकार करणार आहेत. इतरही बँका अधिक प्रभावीपणे पिक विम्याचे काम करणार आहेत.
          पिक विमा जमा करताना लागणाऱ्या कागदपत्राबाबत जिल्हाधिकारी यांनी विशेष सुचना दिल्या. कर्जदार शेतकऱ्याने पिक विमा भरण्यासाठी आपल्या बँकेकडे पिक पेऱ्याचा दाखला व ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी सादर करावे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्याने जोडावयाचा सातबाराचा दाखला जो तलाठीकडून निर्गमित केलेला किंवा इंटरनेटवरून काढलेला स्वसाक्षांकित असावा. पेरणीचा दाखला,छायाचित्र, ओळखपत्र तसेच बँकेच्या खातेपुस्तिकेची प्रत आपल्या सेवा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बँकेकडे सादर करावी. असेही आवाहन करण्यात येत आहे.
          जिल्हाधिकारी राम यांनी या बैठकीत गेल्या खरीप हंगामातील पिक विम्याच्या रकमेच्या वाटपाचा आढावा घेतला. 893 पैकी 682 कोटी रुपयांचे आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. चालु खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाचे 1750 कोटी रुपयांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असून आतापर्यंत 1186 कोटी म्हणजे 68 टक्के पिक कर्ज  वाटप करण्यात आले आहे. अजूनही बँका प्राधान्याने पिक कर्ज वाटपाचे काम करीत आहेत. यावर्षी बीड जिल्ह्यातील बँकेने फळपिक विम्यापोटी 1774 बागायतदारांकडून 58 लाख 86 हजार रुपये एवढी रक्कम पिक विमा कंपनीकडे पाठविली आहे.
          या बैठकीत सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बँकेच्या कामकाजाचा आढावा सादर करुन अडीअडचणी विषयी सविस्तर चर्चा केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा