मंगळवार, २६ जुलै, २०१६

17 वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा सैनिकांच्या खांद्याला खांदा देऊन उभे आहोत हा विश्वास देऊन त्यांचे मनोबल वाढवावे - जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर





            बीड -  देशाच्या संरक्षणासाठी सैनिक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत तसेच कुटूंबियांपासून महिनोन महिने दूर राहून प्राणपणाने देशाचे संरक्षण करीत असल्याने आपण सुरक्षित राहतो. त्यांच्या या महान कर्तव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्याच्या सैनिकांच्या पाठीशी नव्हे तर खांद्याला खांदा देऊन उभे आहोत असा विश्वास सैनिकांना समाजातील प्रत्येकाने देऊन त्यांचे मनोबल वाढवावे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.
            बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहामध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने 17 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, तहसीलदार अशोक नांदलगावकर, गटशिक्षणाधिकारी श्री. हिंगोणीकर, ईसीएच पॉलीक्लीनीकचे केची सिध्दांत, राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडंट जगदीश करपे, उद्योजक गौतम खटोड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर (नि.) यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर म्हणाले की, देशावर लढाईच्या स्वरुपात संकटे येतात. पण लढाई जिंकली की सैनिकांचे काम संपले असे कधीही होत नाही. देशाच्या सीमेवर दररोज शत्रु घुसखोरी करतात. त्यांचा सामनाही अविरतपणे सैनिकांना करावा लागतो. कधी-कधी याबाबतची माहिती आपणापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे सैनिकांच्या कर्तव्यांचे आणि बलिदानांचे महत्व समजण्यासाठी, सैनिकांचा त्याग आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी याबाबत संदेश समाजामध्ये पोहचण्यासाठी कारगिल वियज दिवसासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. जेणेकरुन आजचा तरुणही देशसेवेसाठी सैन्यदलामध्ये जाण्यास प्रवृत्त होईल असेही श्री.पारस्कर यावेळी म्हणाले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यावेळी म्हणाले की, सैनिकांप्रती ऋण व्यक्त करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातूनही सैनिक, माजी सैनिक, शहीदांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, सर्व काही बदलता येते पण देशाच्या सीमा बदलता येत नाही. देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावताना शत्रुपेक्षा निसर्गाशी मोठया निकराने मुकाबला करावा लागतो. त्यामुळे देशरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाला आणि कर्तबागारीला तोड नाही हे कारगिल लढाई विजयाच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहेत. युवकांनी सैनिकांपासून प्रेरणा घेऊन सैन्यामध्ये भरती व्हावे आणि देशाची सेवा करावी असे आवाहन श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित युवक-युवतींना केले. तसेच जिल्ह्यातील सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
            यावेळी वीरपत्नी, वीरमाता, यांचा भेटवस्तु व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकाच्या पाल्यांचे शिक्षण, प्रशिक्षण, मुलींचे विवाह यासाठीच्या धनादेशाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनीटे शांतता पाळून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजीराव केदार  आणि अभिमन्यु शिंदे  यांनी केले तर आभार श्री. मलवाड यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
            यावेळी जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित यांच्यासह राष्ट्रीय छात्रसैनिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाचे बी.एल.खंडागळे, एस.आर.काशिद, एस.एम.खारे, शेख जमील, के.व्ही. जाधव,आर.व्ही.बांगर यांनी परिश्रम घेतले.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा