मंगळवार, १९ मे, २०२६

तृतीयपंथीयांना बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बीड, दि. 19 (जिमाका) :- तृतीयपंथीय बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासोबतच त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आर्थिक वर्ष 2026-27 पासून तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय बीज भांडवल योजना लागू करण्यात आली आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे. बीज भांडवल योजनेतर्गत 18 ते 50 वयोगटातील तृतीयपंथीयांना 25 हजार रुपये ते 2 लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते. यामध्ये लघु कर्ज योजना, मध्यम कर्ज योजना व दीर्घ कर्ज योजना असे कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 50 हजार रुपये व 2 लाख रुपये अशी आर्थिक मर्यादा विहीत करण्यात आली आहे. या योजनेतून भाजी स्टॉल, चहा/स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स/लॅमिनेशन सेंटर, फ्रूट स्टॉल, पिठाची गिरणी, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मिनी मालवाहतूक टेम्पो, पिठाची गिरणी, वडापाव/ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, सलून/ब्युटी पार्लर, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे, लॉन्ड्री/धोबी व्यवसाय, चिकन/मासे विक्री केंद्र, बटाटा वेफर्स बनविणे इत्यादी व्यवसायासाठी कर्ज देय आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये लाभार्थी हिस्सा 5 टक्के, राष्ट्रीयकृत बँकेकडून विहित व्याजदराने 50 टक्के कर्ज व 45 टक्के शासन अनुदानाचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित तृतीयपंथीय व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा किमान दहा वर्ष रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधिताकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या कर्ज योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची तसेच कोणत्याही प्रकारचे तारण ठेवायची गरज नाही. संबंधित लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. असेही कळविले आहे. -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा