बुधवार, ४ जानेवारी, २०१७

विविध विकासाच्या योजना राबवून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री ना. पंकजा मुंडे






            बीड, दि. 4 :- जिल्हयातील नागरिकांचा व गावांचा विकास होण्यासाठी ग्राम विकास खात्याच्या योजनेसह इतर विभागाच्या योजना राबवून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास तसेच महिला बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  ना. पंकजा मुंडे यांनी केले.
            विकास पर्व कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते केज, बीड, व शिरुर तालुक्यातील वेगवेगळया गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमीपूजन आणि शुभारंभ करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार संगिता ठोंबरे, संतोष हंगे, रमेश आडसकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री ना. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्राम विकासाच्या योजना जिल्हयात  यशस्वीपणे राबविल्यास त्याचा फायदा ग्रामिण भागातील नागरिकांना होणार असल्याने यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून त्याचा नागरिकांना मिळवून दिला पाहिजे. जिल्हयातील रस्त्यांसह पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावरही भर देण्यात येत असून या सर्व योजनांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. या सर्व योजनांसाठी मोठया प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विकास योजना पूर्णत्वास  नेण्यासाठी कोणती अडचण येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हयात मोठया प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामे झाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामांमध्ये तसेच गावशिवारामध्ये मुबलक पाणी साठा निर्माण झाला आहे.  त्यामुळे पीक परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध असणे गरजे आहे. असेही पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हयातील गावांच्या विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्न येणाऱ्या काळात टप्याटप्याने सोडविण्यात येतील.  या विकासाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना योग्य दाबाने आणि नियमित विद्युत पुरवठा करण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्रे, ट्रांसफार्मर आदी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार  योजना आदी विशेष सहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देऊन त्यांचेही जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार संगिता ठोंबरे म्हणाल्या की, केज मतदार संघात मोठया प्रमाणात निधी प्राप्त झाला असून मिळालेल्या निधीतून विकासाची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या भागात रस्ता, पाणी, विज यासारखी कामे मोठयाप्रमाणात झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, जि.प. सदस्य गयाताई कराड, अँड. दिलीप करपे, दत्ता पाटील, हिंदूलाल बागडे, शालीनी कराड यांच्यासह अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार अविनाश कांबळे संबंधित गावाच्या परिसरातील पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.                                                        
विकास कामांचा शुभारंभ
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विकासपर्व दौऱ्यात केज मतदार संघातील गावामध्ये विविध विकास कामाचे शुभारंभ, भुमिपूजन, लोकार्पण करण्यात आले यामध्ये सावळेश्वर, पैठण,युसूप वडगाव, गोटेगाव, साळेगाव, टाकळी, मस्साजोग, सारुळ पाटी, दहिफळ तसेच 9 कोटी खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या केज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाच्या कामाचे भूमीपूजनही त्यांनी यावेळी केले.  बीड तालुक्यातील विविध विकास कामाचे शुभारंभ, भुमिपूजन, लोकार्पण करण्यात आले यामध्ये तांदळयाची वाडी, डोईफोडवाडी, येळंबघाट, चाकरवाडी, जेबा पिंप्री 33 केव्ही सब स्टेशन, सात्रापोत्रा, अंबिलवडगाव, नेकनूर गावांचा समावेश आहे तर शिरुर तालुक्यातील विविध विकास कामाचे शुभारंभ, भुमिपूजन, लोकार्पण करण्यात आले यामध्ये श्री क्षेत्र नारायणगड-पोंडूळ, वंजारवाडी  या गावांचा समावेश आहे.
अंगणवाडीतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

केज तालुक्यातील पैठण येथील अंगणवाडी केंद्रास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देवून अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्ययार्थ्यांनी तेवढयाच उत्साहाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पालकमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शाबसकी दिली व उपस्थित शिक्षक वृंदास सूचना केल्या आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीचीही चव घेतली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा