बीड, दि.
7 :- भारताच्या संरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या जनानांच्या कुटूंबियांच्या व निवृत्त
सैनिकांच्या पूनर्वसनासाठी ध्वजदिन निधीतून कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यासाठी
ध्वजदिन निधीस नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम
यांनी केले.
बीड येथील
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ध्वजदिन
निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. या कार्यक्रमास
पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी, वीरचक्र विजेते कॅप्टन अरुण रामलिंग माळी (पाटोदा), कर्नल कल्याण
डोरले, विंग कमांडर छेती सिध्दान, शिक्षणाधिकारी जैसवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता नाईकवाडे व जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची व्यासपीठावर
उपस्थिती होती.
ध्वजदिन
निधीचे महत्व विशद करतांना जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, सामन्य जनतेला सैन्य
आणि सैनिकांच्या व त्यांच्या कुटूंबियांप्रती उदात्त भावना व्यक्त करण्याची संधी म्हणून
ध्वजदिन निधीकडे पाहिले पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्याग व बलिदान देणाऱ्या
सैनिकांचा सन्मान करुन शकतो ही भावना वाढीस लागावी हा शासनाचा उद्देश आहे. सैन्यातून
निवृत्त झालेला सैनिक माझ्या मते कधीही माजी सैनिक नसून तो सदैव समाजासाठी कार्यरत
राहणारा कायम सैनिकच असतो. अशा सैनिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय कार्यालयांनी प्राधान्याने
पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.
ध्वजदिन
निधी संकलनाचे चालु वर्षीचे उद्दीष्ट पूर्ण झाले नसले तरी ते डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात
येईल व पुढील वर्षाचे उद्दीष्ट लवकर पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करण्यात येईल असे
सांगून जिल्हाधिकारी राम यांनी भारतीय सैन्याच्या व सैनिकांच्या अतूलनीय योगदानाबद्दल
गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या प्रती आपल्या संवेदना प्रत्येकांनी विविध माध्यमातून
व्यक्त कराव्यात असे आवाहन केले.
पोलीस
अधिक्षक अनिल पारस्कर यांनीही यावेळी सैनिकांच्या बलिदान व त्यागाबद्दल गौरवोदगार काढून
त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी सामान्य जनतेने पुढाकार घेण्याची गरज
असल्याचे सांगितले. कारगील, पठाणकोट, उरी अशा हल्ल्याप्रसंगी आपल्या सैन्याने व सैनिकांनी
बजावलेली कामगिरी सर्वांच्या लक्षात आहे. त्यांच्या अतूलनीय योगदानाबद्दल प्रत्येक
भारतीयाला अभिमान असून त्यांचा गौरव सारा देश करीत आहे. यामध्ये आपणही मागे राहता कामा
नये असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे
यांनीही यावेळी आपल्या मनोगतात सैनिकांच्या शौर्याचा गौरव केला व देशाच्या देशभक्ती
व देशप्रेमाची ज्योत अजरामर रहावी यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादन
केली.
प्रारंभी
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर यांनी. सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक
केले. ध्वजदिन निधी संकलनामागील शासनाची भूमिका व बीड जिल्ह्याने केलेल्या कागगिरीची
माहिती दिली. या निधीतून देशसंरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सैन्य दलातील अधिकारी
व जवानांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबियांना तसेच निवृत्त झालेल्या
व अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांना आर्थिक मदत दिली जाते तसेच त्यांच्या कल्याणासाठी
विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे कॅप्टन ढोरजकर यांनी सांगितले.
प्रारंभी
देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शुरवीर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
केएसके महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे स्वागतगीत व 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत
सादर करण्यात आले. ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट योगदान दिलेल्या कार्यलयांना यावेळी
भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले तसेच वीर पत्नी व वीर माता यांचाही भेट
वस्तु देवून गौरव करण्यात आला. माजी सैनिक व त्यांच्या विधवांनाही यावेळी आर्थिक मदतीचे
धनादेश देण्यात आले.
या कार्यक्रमास
जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, सैनिकांचे कुटूंबिय, अधिकारी-कर्मचारी
तसेच एनसीसीचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सैनिक
बाजीराव केदार यांनी केले तरी आभार माजी सैनिक श्री.मलवाड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा