बीड, दि. 17 :- जिल्हयातील परवानाधारक कृषी निविष्ठा धारक
विक्रेत्यांनी कृषी निविष्ठा विक्री करतांना रोखरहीत व्यवहार करण्यासाठी विविध माध्यमाचा
वापर करावा आणि चलन टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना
निविष्ठा खरेदी करतांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्व विक्रेत्यांनी रोखरहित प्रणालीची माहिती जाणून
घेवून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये रोखरहीत व्यवहारांना
प्रोत्साहन देण्याबाबत जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व परवानाधारक
कृषी निविष्ठा (बियाणे, रासायनीक खते, किटकनाशके) विक्रेत्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात
आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यशाळेस कृषी उपसंचालक
डी.एम. गायकवाड, कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री
यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नामदेव ननावरे पुढे म्हणाले की, कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी रोखरहित व्यवहार करण्यासाठी
असलेल्या वेगवेगळ्या प्रणालीची माहिती अवगत करुन घ्यावी व स्वत: प्रशिक्षित व्हावे
तसेच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षित करावे. रोखरहित प्रणालीचा वापर करुन बँक आणि शेतकरी
यांच्यातील दुवा म्हणून सर्व विक्रेत्यांनी मदतीची भूमिका ठेवावी व यापुढे कृषी निविष्ठांची विक्री रोखरहित व्यवहाराद्वारे
करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण
यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले की बँकींग व्यवहाराबाबत काही तक्रारी असल्यास
किंवा विक्रेत्यांना रोखरहित व्यवहारासाठी अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या
हेल्पलाईन 1077222604 क्रमांकाची मदत घ्यावी. तसेच दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकाच्या
माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी अधिकाधिक
माहिती जाणून घ्यावी. रोखरहित व्यवहार करत असताना सेवादात्याकडून आकारण्यात येत असलेल्या
अधिभारसंबंधी भिती न बाळगता नवीन ई माध्यमांचा वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक
महेश गोले यांनी परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना संगणकीय सादरीकरणाद्वारे रोखरहित
व्यवहाराच्या असलेल्या विविध पध्दतीचा कसा
अवलंब करावा याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये पीओएस-स्वाईप मशिन, एसबीआय बड्डी
ॲप्स, युपीआय ॲप्स, ई-वॉलेट, युएसएसडी, एमएमआयडी, आधार कार्ड लिकिंग बँकींग आणि मोबाईल
टू मोबाईल बँकींग इत्यादी पध्दतीचे व्यापाऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
तसेच व्यापाऱ्यांनी मर्चंट ॲपचा वापर करुन आपला व्यवसाय पारदर्शी करावा असेही त्यांनी
यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी
विकास अधिकारी डी.बी.बिटके यांनी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना जे विक्रेते रोखरहित व्यवहारासंबंधी
कौशल्य आत्मसात करणार नाहीत त्यांना भविष्यात व्यवसाय करतांना अडचणींना सामोरे जावे
लागेल. त्यासाठी व्यापाऱ्यांनेही स्वत:पासून सुरुवात करुन इतरांना प्रशिक्षित करावे
व रोखरहित व्यवहाराचे आधुनिक तंत्र अवगत करुन
त्यांचा वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या
कार्यशाळेस कृषी अधिकारी,जिल्हयातील परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेते यांच्यासह कृषी
विभागातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा