शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष ऑनलाईन अद्यावत करावेत



            बीड, दि. 17 :-  महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदा मधील अधिकारी-कर्मचा-यांचा सर्वंकष माहितीकोष अद्यावत करण्यात येणार आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेतर आस्थापनेवरील कर्मचारी तसेच तदर्थ नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती दि.31 ऑक्टोबर 2016 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे. त्यानुसार बीड जिल्हयातील राज्य शासन, जिल्हा परिषद, मधील सर्व कर्मचा-यांचा माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

            सर्वकष माहितीकोष तयार करणेकरीता आवश्यक असणारी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली महाराष्ट्र शासनाच्या https://mahasbd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर EMDb या नावाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालयामधून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करुन घ्यावयाचा आहे. कर्मचारी माहितीकोषाचे पुर्ण काम अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली पुर्ण करण्यात येणार आहे. माहिती पूर्ण भरल्यानंतरच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून माहिती प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.  माहितीकोषामध्ये सर्व कार्यालयांनी कार्यालयाची तसेच कर्मचा-यांची माहिती माहे जानेवारी 2017 अखेर अद्यावत करावी अन्यथा संबंधित कार्यालयाचे जानेवारी 2017 चे वेतन देयके जिल्हा, उप कोषागार कार्यालयामध्ये पारित होणार नाहीत. त्या अनुषंगाने माहितीकोषामध्ये माहिती अद्यावत करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करावी. असे बीडचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा