शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

रोकड टंचाई दूर करण्यासाठी बँकांना सुचना कॅशलेस व्यवहारासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची गरज - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



                                                              
          बीड, दि. 3 :- ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी सध्याची रोकड टंचाई दूर करणे गरजेचे असून त्यासाठी कॅशलेस व्यवहारासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            केंद्र शासनाने रु.500 आणि रु.1000 च्या चलनी नोटा 8 सप्टेबरच्या मध्यरात्रीपासून चलनातून बंद केल्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी व इतर व्यवहारामुळे बँकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे व काही प्रमाणात रोकड टंचाई आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व संबंधित अधिकारी व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
            ग्रामीण भागातील बँकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सविस्तर आढावा घेवून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, ग्रामीण जनतेला आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी  प्राधान्याने बँकांनी पैसे उपलब्ध करुन दिले पाहिजेत. शेती व्यवसायातील गरजा लक्षात घेऊन शेतकरी खातेदारांची गैरसोय होणार नाही यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा व आवश्यक असलेल्या रोकड मागणीसाठी वरीष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करावा. सर्वांना काही न काही पैसे मिळतील व त्यांचे व्यवहार सुरु राहतील ही किमान गरज पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगून लोकांनीही बँकेत गर्दी करण्याचे टाळावे व आपले शक्य तेवढे व्यवहार कॅशलेस करण्यावर भर द्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केले.
            जनधन खातेधारकांची संख्या व सध्याच्या जुन्या नोटांच्या बदलण्याच्या व नव्या रोकड व्यवस्थेबद्दल आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, कॅशलेस व्यवहारासाठी असंघटीत क्षेत्रातील व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यासारख्या घटकांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकींग, पीओएस मशीन, ई-व्हॅलेट यासारख्या आधुनिक सुविधांचा वापर वाढविण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. पीओएस मशिनसाठी व्यावसायिकांकडून मागणी आल्यास तात्काळ मशीनचा पुरवठा बँकांनी करावा. अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामरोजगार, रोजगार हमी योजनेवरील मजूर, वनकामगार इत्यादी लहान घटकांचे मानधन व वेतन त्यांच्या खात्यामार्फत केले जात असले तरी त्यांच्यापैकी सहकारी बँकामधील खातेधारकांना सुविधेसाठी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडण्याची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी शेतकरी-शेतमजूरांच्याही अशा खात्याविषयी तात्काळ माहिती घेण्याचे निर्देश दिले.
            पेट्रोल पंपावर पीओएस मशिनच्या असलेल्या सुविधांची सध्यस्थिती जाणून घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी सर्व पेट्रोल पंपधारकांना अशा सुविधा निर्माण करण्याविषयी  पुढाकार घेण्याची सुचना करण्यात येणार असल्याचे सांगितले. शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या महा ई सेवा केंद्र आणि संग्राम केंद्राच्या ठिकाणीसुध्दा अशा सुविधा निर्माण करुन देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक बँकांनी 5 डिसेंबर पर्यंत किमान पाच गावात शंभर टक्के कॅशलेस व्यवहार होईल असे नियोजन करावे असे सांगितले.

            बँकांनी पेंशनधारक व सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन उचलन्यासाठी स्वतंत्र खिडकी सुरु करण्याची सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी कॅशलेस व्यवहारासाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या सेवा-सुविधांची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण तसेच विविध विभागाचे अधिकारी व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा