शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम; जिल्हाधिकारी यांचे निर्देश जारी


          बीड, दि. 2 :- राज्य निवडणूक आयोग यांनी माहे जानेवारी ते मे 2017 या कालवधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने  अस्तित्वात  आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.  कार्यक्रमाचे अनुषंगाने बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मोरेवाडी ता.अंबाजोगाई बुधवार दि.28 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान होत असून मतमोजणी गुरुवार दि.29 डिसेंबर 2016 रोजी होत आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये आणि निवडणूका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पडाव्यात त्या दृष्टीने संबंधितांनी योग्य ती नियमाधिन कार्यवाही करावी अशा सुचना जिल्हाधिकारी, बीड यांनी विविध विभागांना दिल्या आहेत.

          कायद्याची तरतुद लक्षात घेता निवडणूका निर्भय मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठीच्या दृष्टीने लोकसभा निवडणूकांच्या वेळी ज्याप्रमाणे कार्यवाही केली जाते त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या वेळी सर्व आवश्यक बाबींवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती गळणार नाहीत व मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदान पथकास कुठल्याही कारणामुळे अडचण येणार नाही याची जबाबदारी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प.बीड व संबंधित बांधकाम विभाग जि.प.बीड यांची राहील. मतदान केंद्र व निवडणूकीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त पुरवणे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक बीड यांची राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी कक्षाची स्थापणा तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा दैनंदिन अहवाल पाठविणे ही संबंधित तहसिलदार यांची जबाबदारी राहील. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदाना दिवशी, मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी अधिक्षक अभियंता म.रा.वि.म. बीड यांची राहील. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदाना दिवशी, मतमोजणीच्या दिवशी निवडणूक असलेल्या क्षेत्रासहीत लगतच्या क्षेत्रामधील  गावासहीत दारु विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील याची जबाबदारी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क,बीड यांची राहील. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुका उप निबंधक सहकारी संस्था यांची राहील. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरल्यापासून होणाऱ्या दैनिक खर्चाची माहिती संबंधित तहसिल कार्यालयातील खर्च तपासणाऱ्या पथकास सादर करणे जरुरी आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत खर्चाचा हिशोब विहीत शपथपत्रासहित सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांवर राहिल. तसेच मुदतीत खर्च सादर न केल्यास त्या उमेदवारांना निरर्ह करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार यांची राहील. मतमोजणी नंतर मतदान यंत्रातील मेमरी सुरक्षित रित्या राहण्यासाठी संबंधित कोषागार कार्यालयात जमा करण्यात याव्यात. अशा सुचना जिल्हाधिकारी, बीड यांनी दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा