शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

' संवादपर्व ' उपक्रमात ग्रामस्थांशी संवाद गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधण्यास ग्रामस्थांनी प्राधान्य द्यावे - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे


बीड, दि. 9 :- स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपुरक बाबी असल्याने गाव हागणदारीमुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यामुळे गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधण्यास ग्रामस्थांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  नामदेव ननावरे यांनी केले.
गणेशोत्सव कालावधीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय बीड आणि जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 'संवादपर्व' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी बीड तालुक्यातील दगडीशहाजानपुर येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, बबनराव गवते, विस्तार अधिकारी बी.एस. शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागाच्या  विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाचा विकास करण्याबरोबरच गावातील वातावरण आरोग्यदायी करण्यावरही भर द्यावा. गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय असणे आवश्यक आहे. उघडयावर शौचाला जाण्यामुळे गावपरिसरातील वातावरण दुषित होते आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तसेच उघडयावर शौचाला गेल्यामुळे सर्वात वाईट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो तसेच जन्मणारी बालकेही कमी वजनाची आणि कुपोषित जन्मतात. त्यामुळे गावकऱ्यांनी उघडयावर शौचास जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ननावरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ननावरे  यांनी उघडयावर शौचाला गेल्यामुळे सर्पदंश, अपघात तसेच महिलांवर अत्याचार यासारख्या झालेल्या घटनांचे दाखले देऊन शौचालयांचे महत्व गावकऱ्यांना पटवून दिले आणि शासनाच्या ग्रामविकासाच्या विविध योजनांची त्यांनी यावेळी दिली.
यावेळी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक म्हणाले की, गावकऱ्यांनी 29 सप्टेंबरपर्यंत गावात शंभर टक्के शौचालयांचे बांधकाम करुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. गावकऱ्यांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे. नवोदय विद्यलयाच्या प्रवेशासाठी त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहित करावे तसेच युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करुन चांगले भविष्य घडविण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवावे. कारण एक सुसंस्कृत पिढीच गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करु शकते असेही वासनिक यावेळी म्हणाले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दगडी शहाजानपूरच्या ग्रामस्थांना किती दिवसात शंभर टक्के शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त करणार असा प्रश्न थेट ग्रामस्थांना विचारल्यानंतर ग्रामस्थांनी एक मुखाने हात उंचावून येत्या एक महिन्यात शंभर टक्के शौचालय बांधण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बबनराव गवते, विस्तार अधिकारी बी.एस. शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दगडी शहाजानपूर गावातील नागरिक, महिला, युवक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी दगडी शहाजानपूर येथील गणपती मंडळातील श्रीं ची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा