शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

'संवादपर्व' उपक्रमात शासनाचा संवाद गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा - मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे



बीड, दि. 9  :- शासन विविध योजना व उपक्रमांच्यामाध्यमातून ग्रामविकासाला शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गावाचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव  ननावरे यांनी केले.
गणेशोत्सव कालावधीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय बीड आणि जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 'संवादपर्व' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी बीड तालुक्यातील लिंबारुई येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, लिंबारुई गावच्या सरपंच श्रीमती गंगा शिवनाथ ठाणगे, बबनराव गवते, विस्तार अधिकारी बी.एस. शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव  ननावरे म्हणाले की, गावाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो. त्यामुळे ग्रामविकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्राम विकासासाठी स्वदेशी, स्वच्छता, आरोग्य, जलसंधारण यासारख्या  विविध योजना शासनामार्फत  राबविण्यात येत आहे. स्वदेशी, स्वच्छता, आरोग्य, जलसंधारण ही चतु:सुत्री गावाच्या विकासामध्ये महत्वाची आहे. ग्रामस्थांनी गावपरिसरात स्वच्छता ठेवल्यास रोगराईला आळा बसण्यास मदत होते व गावाचे वातावरण आरोग्यदायी राहते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे म्हणाले की, आपणांला गेल्या काही वर्षात सातत्याने टंचाईचा सामना करावा लागला. गावशिवारातील पाणी पातळी वाढण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मागील काळामध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावशिवरातील भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांनाही प्राधन्य देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्रामीण जनतेसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ लिंबारुई  गावाने घ्यावा असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा हे आठवडाभरात शंभर टक्के शौचालये बांधून हागणदारी मुक्त झाले आहे. या गावाचा आदर्श समोर ठेऊन लिंबारुईच्या ग्रामस्थांनही त्यांचे गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी एकजुटीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. शौचालयाचे महत्व सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे म्हणाले की, शौचालयाअभावी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये वृध्द व्यक्तींची हाडे मोडणे. दुर्गंधीमुळे महिलांना खुजी मुले जन्माला येणे तसेच काही मुले कमी वजनाची जन्माला आल्याचीही उदाहरणे आहेत. आपले व आपल्या गावाचे आरोग्य आपल्या हातात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासनिक यांनी स्वच्छतेचे महत्व विषद करणारी मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे यांनी तयार केलेली कविता सादर केली. त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावे आता स्वच्छतेच्या मार्गावर असून येत्या काळात संपूर्ण जिल्हा स्वच्छ होईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बबनराव गवते, विस्तार अधिकारी बी.एस. शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी लिंबारुई येथील स्वयंसेवी संस्थेच्यावतीने शौचालय बांधण्यास मदत म्हणून एका निराधार महिलेला शौचकुपाचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा