शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६




शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या
घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
                                 - ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे
                  
          बीड, दि. 2 :- शासन सर्वसामान्यासाठी राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
          परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन, ममदापूर, कौडगाव हुडा, कौडगाव घोडा, सावरगाव, गाढे पिंपळगाव आदी गावांना भेटी देवून तेथील दुष्काळ निवारण उपाययोजनांचा आढावा घेतला तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या या पाहणी दौऱ्या दरम्यान हिवरा येथे मार्गदर्शन करताना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे बोलत होते.
          यावेळी परळीच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर, तहसीलदार विद्याचरण कवडकर, गटविकास अधिकारी एस.एन. मुंडे, जलसंधारण विभाग अंबाजोगाईचे उपअभियंता एच.आर.मुंडे, बाळासाहेब पिंगळे, भय्यासाहेब पिंगळे यांची उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलतांना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, सर्वसामान्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
          जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान व शिवजलक्रांतीच्या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली असल्यामुळे त्याचा फायदा त्या भागातील गावांना व शेतकऱ्यांना होत आहे. ही कामे लोकसहभागामुळे यशस्वी झाली आहेत. या कामांमुळे गाव परिसरातील जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास निश्चितच मदत होत आहे. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी हिवरा गोवर्धनसह विविध गावांतील सिमेंट नाला बंधारा तसेच नदी पुनरुज्जीवनाच्या कामातील जलसंचयाचे जलपुजन केले.
          यावेळी मंत्री महोदयांनी विविध गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या तसेच पीक कर्ज, पीक नुकसान भरपाई अनुदान, पाणी पुरवठा, रस्ते,  घरकुल, पाणंद रस्ते आदि प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु अशी ग्वाही दिली.

          यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी हिवरा गोवर्धन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारुन त्यांचा अभ्यास घेतला. यावेळी एका विद्यार्थीनीने सुंदर कविता मंत्री महोदयांसमोर सादर केल्याने मंत्री महोदयांनी त्या विद्यार्थीनीचे कौतूक करुन शाबासकी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा