गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

' संवादपर्व ' उपक्रमात ग्रामस्थांशी संवाद पिंपळगाव मोचीच्या ग्रामस्थांनी शासनाच्या योजना राबवाव्यात - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे






बीड, दि. 8 :- शासनाच्या अनेक लोकोपयोगी योजना असून पिंपळगाव मोचीच्या ग्रामस्थांनी  एकजूटीने व परस्पर समन्वय साधून आपल्या गावात योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.
गणेशोत्सव कालावधीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 'संवादपर्व' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत बुधवारी बीड तालुक्यातील पिंपळगाव मोची येथे ग्रामस्थांशी संवाद साधतांना ननावरे बोलत होते. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय साळुंके, गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे आणि जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामविकासाच्या विविध योजनांची माहिती देवून मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य बिघडण्यात सर्वात मोठे कारण हे अस्वच्छतेचे आहे. आपला परिसर, आपला गाव स्वच्छ ठेवल्यास रोगराई पसरणार नाही. यासाठी उघड्यावर शौचाला जाणे बंद करुन घरी शौचालय बांधून त्याचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी निर्धार करुन शंभर टक्के शौचालये बांधावीत आणि त्याचा वापर करुन उघड्यावर शौचास बसणे टाळावे. यामुळे संपूर्ण गाव स्वच्छ आणि निरोगी राहिल. शंभर टक्के शौचालये बांधली गेली नाही तर शासन अशा गावांचे विविध विकासकामांसाठीचे अनुदान बंद करु शकते आणि याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामस्थांची राहिल याची नोंद घेण्याचे आवाहन करुन त्यांनी माझी कन्या भाग्यश्री योजना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेविषयी सविस्तर माहिती देतांना मुलगा-मुलगी समानतेची भावना वाढीस लागण्याची गरज प्रतिपादन केली. मुलींच्या जन्माचे स्वागत करुन तिचे भविष्य उज्वल बनविण्याचे  आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. सतराव्या वित्त आयोगाच्या निधीचे थेट ग्रामपंचायतींना वाटप होत असल्याने आता गावे अधिक समृध्द होतील. त्याबरोबरच ग्रामस्थांनीही आपली जूनी मानसिकता बदलावी असे आवाहन ननावरे यांनी केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपळगाव मोची या गावातील ग्रामस्थांनी विचार विनिमय करुन किती दिवसात शंभर टक्के शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त करणार असा प्रश्न थेट ग्रामस्थांना विचारल्यानंतर ग्रामस्थांनी एक मुखाने हात उंचावून येत्या दसऱ्यापर्यंत शंभर टक्के शौचालय बांधण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या हस्ते सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले. सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सर्वजण भारावून गेले होते. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे व सहभागामुळे 'संवादपर्व' उपक्रम यशस्वी होत असल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी गावचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा