शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता
उंचावण्याचे कार्य करावे - पंडित
बीड - शिक्षक हे समाजसुधारक असून त्यांनी नव्या पिढीला
घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन बीड जिल्हा
परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे
बीड जिल्हयातील 11 प्राथमिक, 8 माध्यमिक आणि 1 विशेष शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार
देवून गौरविण्यात आले. या समारंभात मार्गदर्शन करतांना विजयसिंह पंडीत बोलत होते. या
कार्यक्रमास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधिक्षक अनिल पारसकर, मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे, शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती
श्रीमती कमल मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दिपप्रज्वलन
करुन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात
आली.
शैक्षणिक प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे महत्व
असल्याचे सांगून अध्यक्ष पंडित पुढे म्हणाले की, शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य सामाजिक
जाणिवेतून करतांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे जागरुकपणे पाहण्याची
गरज आहे. शिक्षकाबदलचा समाजातील दृष्टीकोन चांगला राहिल याची काळजी सर्वांनी घेतली
पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षक आपले ज्ञानदानाचे कार्य नेटाने पार पाडतात. जिल्हा
परिषद स्तरावरील शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त करुन पंडित यांनी
सर्व शिक्षकांना जिल्हयात ई-लर्निग या अद्यावत शिक्षण पध्दतीचा प्रभावीपणे अवलंब करण्याचे
आवाहन केले. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरावर शिक्षक पुरस्कार
देण्यात येतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुरस्कारप्राप्त
शिक्षकांचे अभिनंदन करुन म्हणाले, समाजाच्या विकासामध्ये सर्वात जास्त योगदान हे शिक्षकांचे
आहे. शिक्षणाचा दर्जा वाढवला गेला तर समाज अधिक विकसित होईल. शिक्षकांना वेगवेगळया
पातळीवर प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी
मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षकांनी शाळाबाहय मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
आणुन त्यांच्यावर चांगले संस्कार घडवावेत.
पोलिस अधीक्षक अनिल पारसकर म्हणाले, खाजगी
शाळांच्या तुलनेने जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये अग्रेसर
होत आहेत. विविध जाती-धर्माची मुले-मुली जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेत असल्याने
या शाळा ख-या अर्थाने सर्वधर्मसमभावाची संस्कृती
जोपासण्याचे काम करीत आहेत. समाज घडविण्याच्या या कार्यात शिक्षकांनी आपले योगदान वाढवावे असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नामदेव ननावरे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करुन लोकमान्य महोत्सव गणेशोत्सव
सजावट स्पर्धेत जिल्हयातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 7 सप्टेंबर
पर्यंत सहभाग नोदवावा. असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या यास्पर्धे विषयी सविस्तर
माहिती देऊन जिल्हयातील शैक्षणिक प्रगतीबद़दल सांगितले.
प्रास्ताविकात सभापती बजरंग सोनवणे यांनी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध उपक्रमांची माहिती देऊन जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठीच्या
निवड पध्दती बद़दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 20 शिक्षकांचा
पुरस्कार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड व बाबासाहेब
केदार यांनी प्रातनिधिक मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी शशीकांत हिगोणीकर यांनीही
मनोगत मांडले.
या समारंभास जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास
धस, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित
होते. समारंभाचे सूत्रसंचलन प्रा. श्रावण गिरी व विद्या लहाने यांनी केले तर निरंतर
शिक्षणाधिकारी विक्रम सारुक यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा