शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

विनापरवानगी गैरहजर 7 सहशिक्षकांना जिल्हा परिषदेने केले निलंबित



          बीड, दि.3:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी शिक्षण विभागातील 7 सहशिक्षकांना विनापरवानगी अनाधिकृतरित्या गैरहजर असल्याकरणाने तडका फडकी निलंबीत केले.
            बीड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळेवरील 7 सहशिक्षक या ना त्या कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता गैरहजर असल्याचे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आले. संबंधित सहशिक्षक जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून अनाधिकृत गैरहजर होते. याबाबत माहे जुलै 2016 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी काही शिक्षक अनाधिकृत गैरहजर राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नूकसान होत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. अनिलकुमार रामदस राठोड (जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गोंदी केंद्र रेवकी, ता.गेवराई.) सुरेश भिमराव हिरेवाड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणवाडी केंद्र बंगाली पिंपळा ता.गेवराई.) श्रीधर विठ्ठल वाघमारे (जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मंगरुळ केंद्र आष्टी क्र.1 ता.आष्टी.) लालासाहेब मल्हारी बळे (जिल्हापरिषद प्राथमिक शाळाआष्टी क्र.1 (उर्दु) केंद्र आष्टी क्र.1 ता.आष्टी.) मारोती भिमराव केंद्रे (जिल्हापरिषद प्राथमिक शाळा ईर्ला, केंद्र एकदरा ता.माजलगाव.)  विनायक रामराव आव्हाड (गटशिक्षण कार्यालय ता.शिरुर.) बाबासाहेब मनोहर चव्हाण (जिल्हापरिषद प्राथमिक शाळातूकुचीवाडी, केंद्र लव्हुरी ता.केज)  हे सात शिक्षक अनाधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तडकाफडकी जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत केले आहे.

            तसेच माहे जून 2016 मध्ये झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हास्तरीय समायोजन समुपदेशनाने करण्यात आले होते. त्यामध्ये काही शिक्षक गैरहजर तर काहिंनी समुपदेशनास हजर राहूनसुध्दा पदस्थापना घेण्यास नकार दिला होता. तर काही शिक्षकांनी पदस्थापना घेवूनही पदस्थापनेच्या ठिकाणी अद्यापही रुजू झालेले नाहीत, अशा सर्व अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदी रुजू होण्यासाठी पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पदस्थापना दिलेल्या ठिकाणी काही शिक्षक रुजू झाले नसल्याबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या शिक्षक पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत असल्यामुळे त्यांनाही दि.17 सप्टेंबर 2016 पर्यंत पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. जे शिक्षक दि.17 सप्टेंबर 2016 पर्यंत रुजू होणार नाहीत अशा सर्व शिक्षकांना दि.19 सप्टेंबर 2016 पासून जिल्हा परिषद बीडच्या सेवेतून निलंबीत समजण्यात येणार आहे व तसे निलंबन आदेश त्यांना निर्गमित करयात येणार आहेत. असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा