गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

'संवादपर्व' उपक्रमात शासनाचा संवाद गावाला निरोगी ठेवण्यासाठी शंभर टक्के शौचालय बांधावेत - मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे







बीड, दि. 8 :- संपूर्ण गावाचे आणि ग्रामस्थ महिला-पुरुषांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शौचालय बांधण्याची मोठी आवश्यकता असून यासाठी स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवादपर्व' उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत बीड तालुक्यातील नाळवंडी या गावात ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड राजेंद्र राऊत, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय साळुंके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण जनतेच्या सुखसोईसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ नाळवंडी गावाने घ्यावा असे आवाहन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे म्हणाले की, अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा हे गाव केवळ सात दिवसात शंभर टक्के शौचालये बांधून हागणदारी मुक्त झाले आहे. त्या गावाला भेटी देवून ग्रामस्थांनी आपले नाळवंडी गावही हागणदारीमुक्त करावे. प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या गावाच्या आणि कुटूंबाच्या सोईसाठी हे प्राधान्याने करण्याची गरज असून यामुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहिल याची दक्षता घेता येईल. शौचालयाअभावी अनेक गावातील ग्रामस्थांना हाडे मोडण्याच्या आजाराने ग्रासले आहे. दुर्गंधीमुळे महिलांना खुजी मुले जन्माला येत आहेत. काही मुले कमी वजनाची जन्माला आल्याचीही उदाहरणे आहेत. आपले व आपल्या गावाचे आरोग्य आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे सांगून त्यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांची माहिती देवून ग्रामस्थांशी दुहेरी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत परस्पर चर्चा विनिमय करुन एका महिन्याच्या आत येत्या दसऱ्यापर्यंत आपल्या गावातील उर्वरित शौचालये बांधकाम करुन शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भोकरे यांनी ग्रामविकासाच्या योजनांची माहिती दिली. स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासनिक यांनी स्वच्छतेचे महत्व विषद करणारी मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे यांनी तयार केलेली कविता सादर केली. त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावे आता स्वच्छतेच्या मार्गावर असून येत्या काळात संपूर्ण जिल्हा स्वच्छ होईल अशी आशा व्यक्त केली. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय साळुंके यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी माहिती देवून सहभागी होण्याचे आवाहन केले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्व सांगून त्यांनी मुलींच्या जन्माचे स्वागत करुन तिच्या उज्वल भविष्यासाठी कोणताही भेदभाव न बाळगता पुढाकार घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी मोकाटे यांनीही यावेळी मार्गदर्शन करुन शासनाच्या योजनांविषयी ग्रामस्थांनी जागरुक राहण्याचे आवाहन केले. यावेळी कल्याण राऊत यांनीही सखोल मार्गदर्शन करुन ग्रामस्थांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली.

प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा