गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

बीड शहरातील 38 परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागु


बीड, दि. 8 :- तलाठी संवर्गाची लेखी परीक्षा रविवार दि.11 सप्टेंबर 2016 रोजी बीड शहरातील एकुण 38 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 1 या वेळेत एकुण 15 हजार 341 उमेदवारांची लघुटंकलेखक व वाहनचालक संवर्गाची दुपारी 3 ते 4.30 या वेळेत शहरातील 2 उपकेंद्रावर एकुण 448 उमेदवारांची परीक्षा होणार असून परीक्षा केंद्राचे 100 मिटर परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.

शहरातील 38 परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी फौजदारी प्रक्रीया संहितेचे 1973 वे 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशित केले आहे की, रविवार दि.11 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा पेपर संपेपर्यत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थीच्या व्यतिरिक्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मिटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्कुलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये आदेश एकतर्फी लागू करण्यात आला आहे. असे बीडचे उपविभागीय दंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी आदेशात नमुद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा