बीड, दि. 1 :- महसूल विभागातील सर्व कार्यालयांनी महिलांसंबंधीची
प्रकरणे तात्काळ निकाली काढून महसूल सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
1 ते 7 ऑगस्ट 2016 या कालावधीत जिल्ह्यात
महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला असून या सप्ताहाच्या निमित्ताने
बीड तहसील कार्यालयाच्यावतीने प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात
ते बोलत होते. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी स्वप्निल मोरे, तहसिलदार अशोक नांदलगावकर,
सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्री.सुर्यवंशी म्हणाले
की, महसूल सप्ताहात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेत शासनाच्या कृषि, सहकार, महिला व बालकल्याण
या विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी, विशेषत्वाने महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या माहितीचा प्रसार करण्यात येणार आहे. तसेच महिला
खातेदाराच्या महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या अडी-अडचणी समजून घेण्यात येणार असून
त्यांचे त्याच ठिकाणी निराकरण करण्यात येणार असल्याने महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा
असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला सक्षमीकरणासाठी शासन वेळोवेळी विविध
योजना राबवित असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील सामान्य महिलांनी घेऊन आपला उत्कर्ष
साधावा. शासनाने विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत परंतू त्या गरजू महिलांपर्यंत
पोहचू शकत नाहीत. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणतेही कार्य केले पाहिजे
तरच स्त्री सक्षमीकरणाची चळवळ गतीमान होईल. स्त्रीने सर्वात अगोदर आर्थिकदृष्ट्या सक्षम
होणे फार गरजेचे आहे यामुळे स्त्री ची एक नवीन ओळख समाजात निर्माण होत असते. कोणत्याही
गोष्टीत महिलांचा सहभाग असणे फार गरजेचे असल्याने महिलांनी कोणत्याही उपक्रमात हिरीरीने
सहभाग घेतला पाहिजे. या सप्ताहात महिलांच्या अडचणीचे निराकरण व्हावे अशी सुचनाही त्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली.
तहसीलदार अशोक नांदगावकर यांनी प्रास्ताविकात
महसुल सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. या सप्ताहात महिलांच्या
सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असून
या सप्ताहात सातबारा व आठ-अ उताऱ्यावर नाव असलेल्या महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी
व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. 11 मंडळामध्ये प्रत्येकी 3 या प्रकारे कार्यक्रमांचे
नियोजन करण्यात आल्याचेही तहसीलदार नांदलगावकर यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी स्वप्निल मोरे यांनी महिलांच्यासाठी
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सप्ताहाच्या निमित्ताने तळागाळातील महिलांपर्यंत
पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली. दिलीप भोसले यांनी गोरगरीब ग्रामीण महिलांना शिधापत्रिकांचे
वाटप करुन या सप्ताहामध्ये त्यांना सामाजिक सहकार्याची भावना जोपासावी असे मत व्यक्त
केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार
परमेश्वर राख यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व महसूल विभागातील
अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा