बीड, दि. 8 :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल
विभागामार्फत महाराजस्व अभियान वर्षभर राबविण्यात येते. यावर्षी महाराजस्व अभियानांतर्गत
1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा महिला सक्षमीकरण महसूल आठवडा म्हणून राबविण्यात आला असून आष्टी
तहसील कार्यालयाकडून या विशेष सप्ताहामध्ये विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष सप्ताहाच्या उदघाटन सोहळा उपविभागीय
अधिकारी गणेश निऱ्हाळी, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती
ए.डी.वाघमारे यांच्या उपस्थितीत व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पार पडला. या कार्यक्रमात विशेष सप्ताहाच्या कार्यक्रमाची रुपरेषा आणि नियोजन करण्यात
आले. तसेच जास्तीत जास्त नाविण्यपूर्ण उपक्रम घेवून महिलांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी तालुक्यातील सर्व विभागांना
केले.
या नियोजनाप्रमाणे आठवड्यातील पहिला कार्यक्रम
2 ऑगस्ट रोजी सकाळी मौजे देसूर आणि संध्याकाळी
मौजे कानडी बु येथे पार पडला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांना विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. महिलांच्या
विविध विभागांच्या समस्यांची नोंद घेवून त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर
अनुक्रमे पारगांव जो, पिंपरखेड, किन्ही, देवळाली, कोयाळ येथे मेळावे घेण्यात आले या
मेळाव्यात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी 110 तोंडी तक्रारी प्राप्त
झाल्या असून त्याचे निराकरण करण्यासंदर्भात संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्या
तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांची नावे अधिकारी अभिलेखात दाखल करण्यासाठी
एकुण 10 अर्ज प्राप्त झाले आहेत. पुरवठा आणि संजय गांधी विभागाच्या विविध तक्रारींचा
पाठपुरावा मेळाव्यात करण्यात आला असून महिलांचे आरोग्य, पोषण, आहार, संरक्षण, कौंटुबिक
हिंसाचारासंबंधी विविध गोष्टीचा उहापोह मेळाव्यात करण्यात आला. महसूल आठवड्याचा समारोप
कार्यक्रम तहसील कार्यालय आणि तलाठी सज्जाच्या ठिकाणी करण्यात आला, असे आष्टीचे तहसीलदार
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा