शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

जिल्ह्यातील धोकादायक रस्ते-पुलाची तपासणी राष्ट्रीय महामार्गावरील बिंदूसरा पुलाच्या पूनर्बांधणीसाठी प्राधिकरणाकडे पाठपुरावा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड, दि.4 :- बीड शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील जुन्या पुलाच्या पूनर्बांधणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून जिल्ह्यातील सर्व धोकादायक पुल व रस्त्यांची तपासणी करुन उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व महामार्गावरील धोकादायक पुलांचा आढावा घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (पुनर्वसन) महेंद्र हरपाळकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तसेच महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील बिंदूसरा नदीवरील जून्या पूलासह जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या शहागड येथील पुलाच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. या दोन मोठ्या पुलांच्या पूनर्बांधणीसाठी तपासणी करण्यात यावी. जिल्ह्यातील बिंदुसरा पूलाचे बांधकाम सन 1938 मध्ये झालेले आहे. जवळपास 78 वर्ष झाली असून या पूलाच्या पूनर्बांधणीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. महामार्गावरील या पूलाची वारंवार दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सन 1988 ला या पुलाचे रुंदीकरण करण्यात आल्याची नोंद आहे. या पुलाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतुकीच्या दृष्टीने ऑडिट करावे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूकीकडे वरीष्ठांचे लक्ष वेधण्यात यावे. यादृष्टीने या पुलाच्या पूनर्बांधणीची आवश्यकता दिसून येते. या बाबतचा संपूर्ण वस्तुस्थितीदर्शक अहवाल महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिले.
बिंदुसरा नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी किंवा पर्यायी पुलाच्या बांधणीविषयी आवश्यक तो पाठपुरावा जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात येईल. असे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी राम यांनी गेवराई जवळील महामार्गावरील जमादारीन पूलाचाही वस्तुस्थितीदर्शक अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला तयार करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील सर्व पुल व रस्ते यांची पाहणी व तपासणी करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या पूल व रस्त्यांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणी व इतर आवश्यक कार्यवाही प्रस्तावित करावी व आवश्यकतेनूसार वरीष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र.211 साठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीच्या मावेजा वाटपाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला व 31 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण मावेजा वाटप पूर्ण करण्याची सुचना यावेळी देण्यात आली.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा