बीड, दि. 12 :- बालकामगार
प्रथेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील बालकामगार मुलांचा शोध घेऊन त्यांना
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरच सर्वेक्षण हाती घेण्यात यावे असे निर्देश
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
जिल्हास्तरीय राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प
समितीची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी मार्गदर्शन
करतांना ते बोलत होते. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ते म्हणाले
की, साधारणपणे आपल्या जिल्ह्यात 9 ते 14 वयोगटातील धोकादायक उद्योग प्रक्रीयामध्ये
काम करणाऱ्या बालकामगार मुलांचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे. यासाठी अत्यंत बारकाईने
सर्वेक्षण करण्यात यावे. यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करुन अचानकपणे तपासणी करुन बालकामगार
शोधले पाहिजेत. अशा बालकामगार मुलांना प्रकल्पामार्फत शिक्षण देवून त्यांचे पुनर्वसन
करण्यात यावे. असेही निर्देश यावेळी जिल्हाधिकारी
राम यांनी दिले.
बीड जिल्ह्यात 23 बालकामगार विशेष प्रशिक्षण
केंद्र कार्यरत असून या माध्यमातून आत्तापर्यंत 3 हजार 960 बालकामगार विद्यार्थ्यांना
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. या मुलांच्या पुढील शिक्षणापर्यंत पाठपुरावा
करण्यात यावा. त्यांचे पूनर्वसन होऊन ते आत्मनिर्भर होतील या दृष्टीने इतर विभागाच्या
योजनांचाही त्यांना लाभ देण्यात यावा अशी सुचना जिल्हाधिकारी यांनी केली. प्रकल्पातील
रिक्त पदे भरण्याबाबत व समितीवर नवीन अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शिक्षण विभाग आणि इतर विभागांचे
समन्वय साधून बालकामगारांसाठी प्रकल्पाचे काम अधिक प्रभावीपणे करावी अशी सुचना करुन
जिल्हाधिकारी राम यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीच्या प्रारंभी समितीचे सदस्य सचिव
तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील यांनी पॉवरपॉईंट
सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा