बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करावेत


                बीड, दि. 10 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय  प्रज्ञाशोध परीक्षा (राज्यस्तर) इयता 10 वी साठी रविवार दि.6 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा इयत्ता 8 वी साठी रविवार दि.20 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात येणार असल्याने या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावेत. असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
            राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेला नियमीत विद्यार्थी, विद्यार्थींनींना या राज्यस्तरीय परीक्षेस बसता येईल. वय, उत्पन्नाची किंवा किमान गुणांची अट  अथवा पुर्वपरीक्षा देण्याची आवश्यकता नाही.
            राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8 वी मध्ये नियमीत शिक्षण घेणारा विद्यार्थी, विद्यार्थींनीस या परीक्षेस बसता येईल. विना अनुदानित  शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी तसेच शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा लाभ घेऊन शासकीय किंवा खाजगी शाळेत शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकाचे (आई व वडिल दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजारापेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा सन 2015-16 च्या आर्थिक वर्षाचा दाखला जोडावा व इतरांनी तहसीलदार, तलाठ्यांचा सन 2015-16 या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. विद्यार्थी इयत्‍ता 7 वी मध्ये 55 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उर्तीर्ण झालेला असावा तर एससी, एसटी, व्हिजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50 टक्के पेक्षा अधिक गुण असावेत.

             राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी शुल्क प्रती विद्यार्थी 120 रुपये व राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुल्क प्रती विद्यार्थी 100 रुपये इतके राहील. तसेच परीक्षा परिषदेचे शाळा संलग्नता शुल्क 200 रुपये आहे. संलग्नता शुल्क दोन्ही परीक्षांसाठी वेगवेगळे भरण्याची आवश्यकता नाही. बुधवार दि.3 ऑगस्ट 2016 पासून ऑनलाईन आवेदनपत्रे व माहितीपत्रक परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून शाळांनी माहिती पत्रकातील सर्व सुचना काळजीपूर्वक वाचून आवेदनपत्र करावेत. अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत बुधवार दि.31 ऑगस्ट 2016 पर्यंत आहे. तारखेनंतर दोन्ही परीक्षेस विलंबशुल्क 100 रुपये प्रती विद्यार्थी आकारले जाईल. ऑनलाईन अर्ज भरलेल्या आवेदनपत्राच्या प्रतीवर विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह, जात व अपंगत्व प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह, एस फॉर्मच्या दोन प्रतीवर मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीनिशी तसेच एसबीआय चलनासह आवेदनपत्रे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, बीड या कार्यालयात तालुक्याच्या वेळापत्रकानूसार दि.1 ते 3 सप्टेंबर 2016 पर्यंत जमा करावीत. या स्पर्धात्मक परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात स्पर्धा परीक्षेसाठी पुर्वतयारीच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. असे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा