मंगळवार, १९ मे, २०२६

समाज कल्याण विभागाचे आवाहन स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी

समाज कल्याण विभागाचे आवाहन स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी बीड, दि. 19 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी शनिवार दि.30 मे 2026 पर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. अंतिम संधी असल्याने विहीत मुदतीत त्रुटीची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज हे कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येतील, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे. इयत्ता अकरावी आणि त्यापुढील व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र आहेत, मात्र जागांअभावी त्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेतून विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, निवासभत्ता आणि निर्वाहभत्ता या स्वरूपात थेट आर्थिक मदत दिली जाते. चालू शैक्षणिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची माहिती संबंधित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन लॉगिनवर पाठविण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप या त्रुटींची पूर्तता केलेली नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी समाजकल्याण विभागाने दि. 30 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर ऑनलाईन पद्धतीने त्रुटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. मुदतीनंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या ऑनलाईन लॉगिनवर जाऊन त्रुटी तपासाव्यात आणि त्या दुरुस्त कराव्यात. ऑनलाईन पूर्तता केल्यानंतर संबंधित कागदपत्रांची हार्डकॉपी घेऊन ती विहीत वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड या कार्यालयात जमा करावी. तरी पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ या प्रक्रियेची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. -*-*-*-*- वृत्त क्र. : दिनांक : 19 मे 2026 जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ बीड, दि. 19 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड मार्फत जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा युवा पुरस्कार, जिल्ह्यातील 1 युवक व 1 युवतीस प्रत्येकी रोख रक्कम 10 हजार रूपये, गौरवपत्र सन्मानचिन्ह पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेसाठी संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेसाठी पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 50 हजार रूपये गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील एकुण सात वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. 12 मे 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र पुरस्कार प्रस्ताव प्राप्त होण्याच्या अल्प प्रतिसादामुळे दि. 25 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे. वर्ष 2019-20 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2018 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2020 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2020-21 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2021 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2021-22 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2020 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2022 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2022-23 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2021 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2023 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2023-24 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2024 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, सन 2024-25 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2023 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2025 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, सन 2025-26 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2024 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2026 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. 19 मे 2026 पर्यंत परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कालिदास होसुरकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे. -*-*-*-*- वृत्त क्र. : दिनांक : 19 मे 2026 तृतीयपंथीयांना बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बीड, दि. 19 (जिमाका) :- तृतीयपंथीय बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासोबतच त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आर्थिक वर्ष 2026-27 पासून तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय बीज भांडवल योजना लागू करण्यात आली आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे. बीज भांडवल योजनेतर्गत 18 ते 50 वयोगटातील तृतीयपंथीयांना 25 हजार रुपये ते 2 लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते. यामध्ये लघु कर्ज योजना, मध्यम कर्ज योजना व दीर्घ कर्ज योजना असे कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 50 हजार रुपये व 2 लाख रुपये अशी आर्थिक मर्यादा विहीत करण्यात आली आहे. या योजनेतून भाजी स्टॉल, चहा/स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स/लॅमिनेशन सेंटर, फ्रूट स्टॉल, पिठाची गिरणी, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मिनी मालवाहतूक टेम्पो, पिठाची गिरणी, वडापाव/ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, सलून/ब्युटी पार्लर, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे, लॉन्ड्री/धोबी व्यवसाय, चिकन/मासे विक्री केंद्र, बटाटा वेफर्स बनविणे इत्यादी व्यवसायासाठी कर्ज देय आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये लाभार्थी हिस्सा 5 टक्के, राष्ट्रीयकृत बँकेकडून विहित व्याजदराने 50 टक्के कर्ज व 45 टक्के शासन अनुदानाचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित तृतीयपंथीय व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा किमान दहा वर्ष रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधिताकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या कर्ज योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची तसेच कोणत्याही प्रकारचे तारण ठेवायची गरज नाही. संबंधित लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. असेही कळविले आहे. -*-*-*-*- वृत्त क्र. : दिनांक : 19 मे 2026 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश सुरू बीड, दि. 19 (जिमाका) :- अंबाजोगाई शहरात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता आठवी पासून पुढील वर्गातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. काही अडचण आल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह अंबाजोगाई यांच्याशी संपर्क करावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा