मंगळवार, २५ जुलै, २०१७

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे आवाहन शेतकऱ्यांनी युरीया खताची आवश्यकतेनूसार खरेदी करावी

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी युरीया खताची
आवश्यकतेनूसार खरेदी करावी
                  
          बीड, दि. 25 :- खरीप हंगाम सन 2017-18 मध्ये जिल्हयात सर्वच पिकांची पेरणी झालेली असून सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत पेरणी 109 टक्के इतक्या क्षेत्रावर झाली आहे.  मागील आठवड्यात  झालेल्या पावसामुळे पिकाची वाढ होत असून शेतकरी आंतर मशागतीची कामे करीत आहेत. शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेला युरीया खत आवश्यकतेप्रमाणे  खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.   
          जिल्हयात सर्वच प्रकारच्या रासायनिक खताचा पुरवठा मोठया प्रमाणात असून खत उपलब्धता  ही समाधानकारक आहे.  झालेल्या पावसामुळे युरीया खताची मागणी वाढत असून या बाबीचा विचार करुन या खताचा पुरवठा वेळेत कसा होईल यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मार्केटमध्ये इफ्को, झुआरी, कोरोमंडल, कृभको, आरसीएफ या उत्पादकाचा युरीया उपलब्ध आहे. मागील आठवडयात जिल्हयात 2 हजार 878 में.टन युरीया खताचा पुरवठा झाला असून अजुनही पुरवठा चालु आहे.
          शेतकऱ्यांनी एका विशिष्ट नावाच्या, कंपनीच्या  युरीया खताची मागणी न करता उपलब्ध झालेला व आपणास आवश्यक असेल तेवढाच युरीया खत खरेदी करावा. निम कोटेड युरीया वापरल्याने पिकास निश्चित फायदा होतो.  तसेच जमीन,  हवा  आणि पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. उपलब्ध असलेला  युरीया खताचे आकारमान लहान, मोठे असले तरी त्यांत नायट्रोजन प्रमाण 46 टक्केच आहे. तसेच तो पिकास वापरण्याची पध्दत ही सारखीच असून त्यामधुन पिकास उपलब्ध होणारा नायट्रोजन ही तेवढाच कालावधीत पिकास उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरीया खताचा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा