गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

'विकास पर्व' दौऱ्यात ग्रामस्थांशी संवाद परळी मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य देणार - पालकमंत्री ना.पंकजा मुंडे





·        विविध विकास कामांचा जोरदार शुभारंभ

            बीड, दि.22 :-  बीड जिल्ह्याबरोबरच परळी वैजनाथ मतदार संघातील प्रत्येक गावा-गावात विकासाची गंगा आणून सर्वांगीन विकासाला प्राधान्य देत असल्याचे सांगून गावा-गावात ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार, दलित वस्ती सुधारणा, नदी पुनरुज्जीवन यासारख्या योजनेतून कोट्यावधी रुपयांची विकासाची कामे सुरु करण्यात आली असल्याचे राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी सांगितले.
            परळी मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्यांनी सुरु केलेल्या विकासपर्व दौऱ्यात विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते लाखो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्या ग्रामस्थांशी संवाद साधतांना बोलत होत्या.
            ना.मुंडे म्हणाल्या की, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे परळी मतदार संघावर अतोनात प्रेम होते. त्यांच्या हयातीत त्यांनी परळीच्या विविध महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवून शेतकरी कष्टकरी जनतेला सुखी समाधानी करण्याचे त्यांचे स्वप्न्‍ा होते. ते अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार असून त्यादृष्टीने आपण एक वर्षापासून काम सुरु केले असल्याचे सांगून त्यांनी सर्व गावांना व ग्रामस्थांना आपल्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
            आज सकाळी जिरेवाडी व डाबी या गावातून सुरु झालेल्या या विकासपर्व दौऱ्यात नागपूर येथे ग्रामस्थांच्या प्रचंड प्रतिसादात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तिर्थक्षेत्र विकास योजने नागापूर येथील महादेव मंदिराचा समावेश करण्यात आला असून योजनेचा विकास आराखडा तयार करुन भरपूर विकास निधी देण्याचे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी विविध विकास कामांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
            मांडेखेल गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ करतांना गावातील युवकांच्या मागणीनूसार व्यायामशाळेच्या उभारणीसाठी 5 लाख रुपयांच्या मंजूरीची त्यांनी घोषणा केली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना ना.मुंडे यांनी परळी मतदारसंघ देशाच्या नकाशावर आणण्यासाठी आपला सर्वांगीन विकासाचा प्रयत्न सातत्याने सुरु राहिल अशी ग्वाही दिली.
            नागपिंप्री येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ  प्रसंगी ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. भारावलेल्या ग्रामस्थांनी फटाक्यांच्या जल्लोषात स्वागत सत्कार केला. ना.मुंडे यांनीही आपल्या भाषणात विविध विकास कामांसाठी दिलेल्या निधीची माहिती देवून येत्या वर्षभरात नागपिंप्रीच्या रस्त्यावर परळी मतदार संधात 300 कि.मी. च्या रस्त्यांची कामे होणार असून यासाठी कोट्यावधीचा निधी देण्यात येत असल्याचे सांगितले. डिसेंबर 2018 पर्यंत एकही रस्त्यांचे काम शिल्लक राहणार नाही असे नियोजन केले असल्याचा पुनरुच्चार ना.मुंडे यांनी केला.
            सोनहिवरा येथील विविध विकास कामांचा शुभांरभही ना.मुंडे यांच्या हस्ते झाला. निस्वार्थ भावनेने आपल्या पाठीशी सदैव राहणारे गाव असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात करुन सोनहिवरा गावच्या ग्रामस्थांचा गौरव केला. 25-15 या विकास योजनेतून विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली असून साधारणपणे 3कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी विविध कामांसाठी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर परिसराच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
            त्याच्या समवेत दौऱ्यात फुलचंद कराड, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी श्रीहरी मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, गयाबाई कराड, जीवराज ढाकणे आदि मान्यवर होते.
विकास कामांचा शुभारंभ

            जिरेवाडी येथे एकुण 12 लक्ष रुपयांच्या, डाबी येथे 21 लक्ष रुपयांच्या, नागापूर येथे 15 लक्ष रुपयांच्या, मांडेखेल येथे 6 लक्ष रुपयांच्या, नागपिंप्री येथे 6 लक्ष रुपयांच्या, सोनहिवरा येथे 22 लक्ष रुपयांच्या, बोधेगाव येथे 12 लक्ष रुपयांच्या, कावळ्याची वाडी येथे 6 लक्ष रुपयांच्या, वाघाळा येथे 9 लक्ष रुपयांच्या, मोहा येथे 12 लक्ष रुपयांच्या, करेवाडी येथे 9 लक्ष रुपयांच्या आणि वाका येथे 12 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामांमध्ये प्रामुख्याने रस्ते, स्मशानभूमी, सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, बंधारे आदि कामांचा समावेश आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा