मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकास कामांना सर्वोच्य प्राधान्य - पालकमंत्री पंकजा मुंडे



        
            बीड, दि. 11 :- बीड जिल्हयाच्या सर्वांगीन विकासासाठी कटिबध्द असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकास कामांना सर्वोच्य प्राधान्य देण्यात येत असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास व महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
            अंबाजोगाई येथील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचा व सभापती तसेच अधिकारी-कर्मचा-यांच्या निवासस्थान इमारतीचा भूमिपूजन सोहळा ना. मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            अंबाजोगाई तालुक्याच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे सांगतांना पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजनांची चांगल्या प्रकारे तालुक्यात अंमलबजावणी केली जात आहे.प्रामुख्याने या तालुक्यात विविध योजनेची जवळपास 150 कोटी रुपयांची विकासाची कामे सुरु असून स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्या म्हणाल्या. मोठया प्रमाणात विकास कामे होत असतांना ती दर्जेदार, टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगून ना. मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हयातील वीज-पाणी-रस्ता आणि घरकुलाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. येत्या पाच वर्षात इतका विकास करु की, या जिल्हयाचा मागास म्हणून असलेला कलंक दूर होईल. गावा-गावांचे संपूर्ण चित्र बदलण्याचा शासनाचा संकल्प असून तो आपण सर्वजण मिळून पूर्ण करु असाही विश्वास ना. मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ग्रामविकास विभाग, रोजगार हमी योजना व इतर योजनांमधून मंजूर केलेल्या निधीची माहिती दिली.
            प्रारंभी ना. मुंडे यांच्या हस्ते इमारत बांधकामाचे विधीवत भूमीपूजन करुन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी 4 कोटी 75 लाख 25 हजार रुपये आणि सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान इमारतीसाठी 4 कोटी 59 लाख 83 हजार रुपयांना प्रशासकीय मान्यतेसह मंजूरी देण्यात आलेली आहे. या बांधकामामुळे गेल्या 55 वर्षातील इमारतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
            पंचायत समितीच्या सभापती श्रीमती उषाताई किरदंत आणि उपसभापती सरीता लव्हारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. माजी सभापती रमेश आडसकर, दिनकर लव्हारे आणि नेताजी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. दोन वर्षातील विकास कामांवर आधारित पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले तसेच शासनाच्या विविध योजनेच्या लाभाचे लाभार्थ्यांना यावेळी वितरण करण्यात आले. पट्टीवडगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गावाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल ग्रामविकास मंत्री मुंडे यांचा सत्कार केला. तसेच उत्कृष्ठ कार्याबद्दल गटविकास अधिकारी दत्तात्रय गिरी यांचाही योवळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे आणि उमेद अंतर्गत बचतगटांना अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले.

            या कार्यक्रमास तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश कराड, महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती गयाताई कराड, राम कुलकर्णी, विजया पाटील यांच्यासह इतर मान्यवर, सरपंच, सदस्य, पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा