बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा प्रस्ताव दाखल करावेत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम


           
            बीड, दि. 14 :- चालु रब्बी हंगामातील गहु, ज्वारी, हरभरा, करडई, सुर्यफुल, व कांदा पिकांसाठी व्यापक स्वरुपातील प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बँकेकडे 31 डिसेंबर 2016 पर्यंत विमा प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
            बीड जिल्ह्यातील पंतप्रधान पिक विमा योजनेच्या कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी राम यांनी आज घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे मुख्य  व्यवस्थापक दिपक कपूर, कृषी उपसंचालक गायकवाड यांच्यासह विविध बँकांचे तसेच विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
            यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असून त्यामुळे शेती पिकांचे उत्पादनही वाढणार आहे मात्र प्रतिकुल परिस्थिती निर्माण होण्याचा संभव टाळता येत नाही. कोणत्याही कारणाने पिकांचे नूकसान होण्यासारखी प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाल्यास पिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरुक होऊन पिकाचा विमा काढला पाहिजे असे सांगत जिल्हाधिकारी राम यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
            चलन तुटवड्याच्या परिस्थितीचा विमा रक्कम भरण्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी राम म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपले परिपूर्ण विमा प्रस्ताव आपल्या बँक शाखेत दाखल करावेत. विम्याचा हप्ता संबंधित बँक त्यांच्या खात्यावरुन परस्पर भरुन घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोख स्वरुपात रक्कम आणण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना विमा प्रस्तावासाठी आवश्यक असणारी सातबारा उतारा, पिक पेरणी अहवाल यासारखी कागदपत्रे तलाठ्यांनी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यावेळी म्हणाले.
            शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव आपल्या बँक शाखेकडे 31 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावयाचे असून शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे होणाऱ्या संभाव्य नूकसानीपासून विमा संरक्षण प्राप्त करुन घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राम यावेळी म्हणाले.
            कृषी विभागाने जिल्ह्यात पिक विमा, मागेल त्याला शेततळे याबरोबरच विविध योजनांच्या जनजागृतीसाठी मंडळ व गावस्तरावर कार्यशाळांचे आयोजन करावे आणि मोठ्या प्रमाणात आकाशवाणी, जाहिरात फलक इत्यादी माध्यमातून जनजागृती करावी अशा सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी जिल्ह्यात रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त रोकड, त्याचे बँकांना वितरण तसेच एटीएम मधील रोकड व्यवस्था इत्यादी बाबींचा आढावा घेऊन पाटोदा शहर तसेच जिल्ह्यातील गावांना रोखरहित व्यवहारासाठी प्रोत्साहित करण्याच्या कामकाजाची माहिती घेतली.
            खरीप आणि रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात झालेलया पिक कर्ज वाटपाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. खरीप हंगामासाठी उद्दीष्टांच्या 81 टक्के आणि रब्बी हंगामासाठी 41 टक्के पिक कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले असून बँका रब्बी हंगामासाठी कर्ज देत असल्याची माहिती अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. बँकांनी अधिकाधिक सकारात्मक होऊन पिक कर्ज वाटप करावे अशी सुचना जिल्हाधिकारी राम यांनी केली.

            यावेळी विविध बँकांकडून करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा