बीड, दि. 11 :- बीड जिल्ह्यामध्ये विविध सण, उत्सव शांततेत
पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांमध्ये ऐक्य
वाढुन कायम जातीय सलोखा व समाजात शांतता कायम रहावी याकरीता आयोजित करण्यात आलेल्या
रन फॉर पीस रॅलीस बीडवासियांनी दिलेल्या ऊर्स्फुत प्रतिसादबद्दल मी आपला अत्यंत आभारी
आहे. तसेच ही परंपरा जिल्ह्यात कायम राहील अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर
यांनी व्यक्त केली.
बीड जिल्हा पोलीस दल, विविध सामाजिक संघटना, मान्यवर व्यक्ती
यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सण, उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच
समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांमध्ये ऐक्य वाढण्यासाठी "रन फॉर पीस"
रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पोलीस
अधीक्षक अनिल पारस्कर बोलत होते.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस
अधिकारी गणेश गावडे, पहिलवान राहूल आवारे तसेच विविध धर्मांचे धर्मगुरु यांची व्यासपीठावर
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर म्हणाले
की, समाजामध्ये शांतता व जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्र
येणे गरजेचे आहे. जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या सण व उत्सवांच्या कालावधीत शांतता व जातीय
सलोखा वृध्दींगत करण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी रन फॉर पीस या रॅलीचे आयोजन करण्यात
आले. या संकल्पनेस बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, शिक्षण संस्था, प्रतिष्ठीत
नागरिक यांनी पुढाकार घेऊन सहभाग नोंदविल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी असल्याचे पोलीस अधीक्षक
अनिल पारस्कर यांनी यावेळी सांगितले.
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंड येथे जिल्हा
पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात
आला. ही रॅली शिवाजी चौक, बलभिम चौक, माळीवेस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे मोंढा,
सावता माळी चौक ते जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी आयोजित
कार्यक्रमात विविध धर्मांच्या धर्मगुरुंनी शांतता व जातीय सलोख्याचा संदेश उपस्थितांना
देऊन मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी रॅलीमधील स्पर्धक अजय घुगे याचा रोख बक्षीस व पुष्पगुच्छ
देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी
तसेच डॉक्टर संघटना, पत्रकार संघटना, व्यापारी संघटना, सराफा संघटना, वकील संघ, पतंजली
योगपीठ, रोटरी क्लब, कोचिंग क्लासेस संघटना, माहेश्वरी महिला मंडळ, विविध महाविद्यालयातील
विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठया
संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश
गावडे यांनी रॅलीच्या आयोजनामागील हेतू विषद करुन सर्व मान्यवर व रॅलीतील सहभागी नागरिक
व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन पेठ बीड पोलीस स्टेशनचे अनिल शेळके यांनी केले.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा