बीड, दि. 14 :- आता गोरगरीबांना देण्यात
येणाऱ्या घरकुल योजनेत अमुलाग्र बदल केले असून पुढील काळात एकही गरीब कुटूंब घरकुलाशिवाय
राहणार नाही अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री
पंकजा मुंडे यांनी दिली.
परळी तालुक्यातील घनाळ तांडा येथील सिमेंट
रस्ता बांधकामाचे भुमिपूजन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की,
राज्यस्तरावर नेतृत्व करीत असतांना केवळ आपला मतदारसंघच नव्हे तर राज्याच्या सर्वांगीण
विकासाचा माझा निर्धार आहे. 30 हजार कि.मी.चे रस्ते देणारी व ग्रामीण भागाला जोडण्याची
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात येत आहे. आज साडे चार कोटीच्या विकास कामांचा
शुभारंभ होत आहेत. ही सुरुवात आहे अशा अनेक रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ लवकरच होणार आहेत. या योजनेमुळे ग्रामीण
भागातील दळणवळणासाठी दर्जेदार रस्त्यांची निर्मिती होईल असेही पालकमंत्री मुंडे यांनी
स्पष्ट केले.
आमचा गाव आमचा विकास हा उपक्रम गावांच्या
विकासासाठी राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी आपल्या गावाचे विकास आराखडे तयार करावेत.
शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देणार आहे. राज्यातील गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी
आम्ही प्रयत्नशिल असून प्रत्येकाने शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे
आवाहनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.
प्रारंभी मोतीराम चोपडे आणि वसंत राठोड यांनी
आपल्या भाषणात घनाळ तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करण्याची व विविध विकास
कामांची अपेक्षा व्यक्त केली.यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते विविध
कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभास तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे,
कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव आघाव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,
पंचायत समितीचे उपसभापती बिभिषण फड, समन्वय समिती अध्यक्ष सचिन मुंडे, संचालक श्रीहरी
मुंडे, भास्कर रोडे, रमेश कराड, वृक्षराज निर्मळ, पंकाबाई राठोड आदि मान्यवर उपस्थित
होते. या ठिकाणी येतांना गोवर्धन येथील मुख्य रस्त्यांच्या कामाचाही शुभारंभ पालकमंत्री
यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नाईक तांडा येथील नियोजित सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजनही
त्यांच्या हस्ते झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा