बीड, दि. 14 :- श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबत
मिशन अंतर्गत गावे विकसित करण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा क्लस्टरची
निवड करण्यात आली असून या मिशनच्या माध्यमातून परिसरातील गावांचा सर्वांगीण विकास होणार
असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
परळी तालुक्यातील हिवरा(गो) येथील सिमेंट
नाला बंधाऱ्याचे जलपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन तसेच समाधान
योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे प्रमाणपत्र व लाभ वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री पंकजा
मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री पंकजा मुंडे शौचालय बांधकामाला
प्राधान्य देणाऱ्या ग्रामस्थांचे कौतूक करुन पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी ग्रामविकासाला मोठे महत्व देवून राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध
करुन दिला आहे. राज्याला मिळालेल्या निधीपैकी जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला
मिळाला आहे. आपल्या गाव परिसरात जलसंधारणाच्या कामांबरोबरच विविध विकास कामे हाती घेण्याचे
नियोजन आहे. ग्रामीण भागातील विकासाचे आम्ही आराखडे तयार करीत आहोत. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतींनी
पुढाकार घेतला तर गावांचा कायापालट होईल अशी परिस्थिती आपल्या सरकारने निर्माण केली
आहे. रेल्वेमार्गाच्या विकासासाठी 550 कोटी
रुपयांचा निधी केंद्राने मंजूर केलेला असून यामुळे परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामाला
गती मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास आपल्या परिसराला फायदा होणार आहे असेही
श्रीमती मुंडे म्हणाल्या. यावेळी ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या
कामाबद्दलही त्यांनी कौतूक केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नामदेव ननावरे यांनी सांगितले की, सिरसाळा परिसरातील गावे विकसित करण्याचे नियोजन केले
असून विविध विकास कामांचा समावेश आराखड्यात करण्यात येत आहे. वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या
निधीतून अत्यंत नियोजनबध्द गावविकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत. सर्व गावे हागणदारीमुक्त
करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वांनी शौचालयाचे बांधकाम करुन सक्रीय सहभागी होऊन ही
लोकचळवळ यशस्वी करावी असे आवाहनही ननावरे यांनी केले.
परळी पंचायत समितीचे गट विकासअधिकारी संजय
केंद्रे यांनी समाधान योजनेविषयी माहिती सांगून प्रास्ताविक केले. यावेळी लाभार्थ्यांना
विविध प्रमाणपत्रांचे व शिधापत्रिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हा
परिषद सदस्य वृक्षराज निर्मळ पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गावांचे सरपंच,
सदस्य, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्था, महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा