बीड, दि. 16 :- महाराष्ट्र
शासनातर्फे सन 2015-16 करिता लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मातंग समाजातील साहित्यिक,
कलावंत, समाजसेवक व सामाजिक संस्थाना प्रदान करण्यात येणार आहेत. या योजनेनूसार मातंग
समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व
आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी झटणारे नामवंत साहित्यिक, कलावंत, समाजसेवक व सामाजिक संस्था
किंवा या क्षेत्रात मुलभूत स्वरुपाचे विशेष कार्य केले आहे अशा व्यक्ती व संस्थांचा
विचार करण्यात येतो. यासाठी 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येते.
व्यक्तींसाठी पुरस्काराकरिता वयोमर्यादा पुरुष 50 वर्ष किंवा
त्यापेक्षा जास्त व महिलांकरिता वयोमर्यादा 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक
राहील. वरील क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावे. तसेच या पुरस्कारास फक्त
मातंग समाजातील वरील क्षेत्रातील व्यक्तींचाच विचार केला जाईल. तसेच त्यांचा चारित्र्य
विषयक व गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे व सार्वजनिक संपत्तीचा अपहार
केला नसल्याचे प्रमाणपत्र व सादर केलेल्या आवश्यक माहितीनूसार निर्णय घेण्यात येईल.
कोणत्याही व्यक्तीस, संस्थेस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार
नाही. हे पुरस्कार स्वयंसेवी संस्थासाठी समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी,
शिक्षण, आरोग्य, अन्याय अत्याचार निर्मूलन, अंधश्रध्दा निर्मूलन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात
कमीत कमी 10 वर्ष कार्य करणाऱ्या संस्था असाव्यात. संस्था पब्लिक ट्रस्ट ॲक्ट व सोसायटी
रजिस्टर ॲक्ट 1960 खाली पंजीबध्द असावी. तत्संबंधी प्रमाणपत्र सादर करावे. संस्थेच्या
आर्थिक व्यवहारात कोणताही गैरव्यवहार नसल्याचे प्रमाणपत्र व संस्थेचे कार्यपक्षातील
व राजकारणापासून अलिप्त असल्याचे प्रमाणपत्र. संस्थेच्या कार्यासंबंधी माहिती व तत्संबधी
कागदपत्र तसेच संस्था कोणते भरीव कार्य करते व आतापर्यंत संस्थेने त्यांचे उदिष्ट कितपत
साध्य केले आहे यासंबंधी अहवाल. संस्थेच्या घटनेची प्रमाणित प्रत व मागील 5 वर्षाचे वार्षिक अहवाल आवश्यक राहील. तसेच
संस्थेचे प्रतिवर्षी लेखा परिक्षण झालेले असावे.
या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था यांनी विहीत नमुन्यात
अर्ज भरुन त्यासोबत कार्य केल्याचे पुरावे इत्यादी तीन प्रतीत दि.25 ऑगस्ट 2016 पर्यंत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,
तिसरा मजला, बीड यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. विहीत मुदतीनंतर व विहीत
नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांच्याकडे संपर्क साधावा. असे समाज कल्याण बीडचे
सहाय्यक आयुक्त वाय.व्ही. गायकवाड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा