गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

बालकामगार प्रकल्पातील मुख्य कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा



          बीड, दि. 18 :- बालकामगारामध्ये आपसात बंधुभाव निर्माण व्हावा, समाजातील सर्व घटकांनी बालकामगार मुलांच्या विकासासाठी स्वत:च्या भाऊ-बहिणीप्रमाणे बालकामगारांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत या उद्देशाने रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील मुलींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून बालकामगार प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे व संध्या बारगजे, लेखाधिकारी श्री.गायकवाड, सहाय्यक लेखाधिकारी श्री.सरदेशमुख, क्षेत्रिय अधिकारी गणेश आवंतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

          इंन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमाला आल्याने मी भारावून गेलो आहे असे सांगून  बालकामगार मुलींनी वयाच्या 18 व्या  वर्षापर्यंत फक्त शिक्षण घ्यावे शिक्षण केवळ नौकरीसाठी नाही तर चांगले जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे असे त्यांनी  सांगितले. या कार्यक्रमात बालकामगार मुलींनी उपस्थितांना राखी बांधून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी बालकामगार प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा