गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

जलयुक्त शिवारची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम





बीड, दि. 11 :- जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या 271 गावांपैकी जवळपास 36 गावातील कामे प्रलंबित असून त्या गावातील कामांना प्राधान्याने सुरु करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या बीड जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेतला यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आणि परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, लघुसिंचन विभाग, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, जलसंधारण आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवारच्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, 271 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी कोणत्या गावातील कोणती कामे प्रलंबित आहेत आणि त्यामागील कारणे काय याची माहिती सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर करावी अशी सूचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांकडे शासनाने प्राधान्यक्रम दिला असून मंजूर झालेली सर्व कामे पूर्ण होण्यासाठी महसूल, कृषी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले.
विविध गावातील प्रलंबित कामांचा तालुकानिहाय आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, भौतिक, तांत्रिक किंवा ग्रामस्थांची अडचण याकारणाने कामे होत नसतील तर तेथील प्रकरण सोडविण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. अन्यथा इतर प्रकारची आवश्यक कामे  प्रस्तावित करता येईल असे सांगून जिल्ह्यातील 236 गावात जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण करुन राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी राम यांनी अभिनंदन केले. उर्वरित 36 गावातील कामे पूर्ण करण्याचे आपले लक्ष्य आहे. जलयुक्तची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याकडे शासनाने विशेष लक्ष दिले असून झालेल्या कामांची छायाचित्रे व तपशिल जिओटॅगिंग करण्याची प्रक्रिया मंदावली असल्याचे लक्षात आले असून शंभर टक्के टॅगिंग पूर्ण करावे. त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विभागांशी संवाद साधून दूर करण्याची सुचना जिल्हाधिकारी राम यांनी केली. झालेल्या कामांची व त्यामध्ये साठलेल्या पाण्याची छायाचित्रे व इतर तपशिल संकलित करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना यावेळी दिल्या.

दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे जलयुक्त शिवारच्या कामाच्या ठिकाणी पाणीसाठा निर्माण झाला असला तरी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीचे सर्वेक्षण हाती घ्यावे व त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा अशा सूचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी गावनिहाय प्रकल्प आराखडे अंतिम करुन सादर करावेत असे सांगितले. या बैठकीत सर्व विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून कामाकाजाचा आढावा घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा