गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

डेंग्यूच्या आजारापासून बचाव करण्यासाठी डासाची वाढ होणारी ठिकाणे नष्ट केली पाहिजेत -जिल्हाधिकारी एम.डी.सिंह



          बीड, दि.2 :- जिल्ह्यातील नागरिकांनी डासापासून होणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारापासून स्वत:चा व परिसरातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी डासाची वाढ होणारी सर्व ठिकाणे नष्ट केली पाहिजेत तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुन्या सारख्या आजाराचा प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भातील आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.भोकरे, श्री.सोळूंके, मधूकर वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की, जिल्ह्यात डासापासून होणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. डेंग्यू, चिकुनगुन्या सारख्या आजाराचा रुग्ण आढळल्यास त्या गावात धुर फवारणी, ॲबेटींग यासारखे तातडीची प्रतिबंधात्मक उपयायोजना करावी. तसेच तापीचे रुग्ण आढळल्यास त्या रुग्णांची योग्य ती तपासणी करुन व लक्षणे पाहून औषधोपचार करावा. डासापासून होणाऱ्या आजारापासून कोणत्याही रुग्णाचा मृत्यु होणार नाही याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          आरोग्य विभागाने डेंग्यू, चिकुनगुन्या या सारख्या डासापासून होणाऱ्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली पाहिजे यासाठी या कामी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच गावस्तरावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका, आशा वर्कर यांची मदत घ्यावी. तसेच या आजाराचा रुग्ण आढळलेल्या गावामध्ये तात्काळ आरोग्य पथक पाठवून तात्काळ आवश्यकती कार्यवाही करावी नागरिकांनी डासापासून होणारे आजार टाळण्यासाठी आपले शहर, गाव व परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. डासाची उत्पत्ती होणारी सर्व ठिकाणे नष्ट केली पाहिजेत, घरातील उघडे पाणीसाठे असल्यामुळे डासाची उत्पत्ती होण्यास मदत होते. यासाठी घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. असेही जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी यावेळी सांगितले.
          तालुकास्तरावर तहसीलदार यांनी सर्व संबंधित विभागाची नियमित बैठक घेऊन प्रभावीपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवावी, ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात यावी तसेच शाळांमधून प्रभातफेरी काढुन जनजागृती करण्यात यावी. आणि शाळेतील प्रार्थनेच्या वेळी डेंग्यू विषयक माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. अंगणवाडीमार्फत देखील तेथील मुलांना व त्यांच्या पालकामध्ये डेंग्यू विषयक जनजागृती करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी बैठकीत सांगितले.
          या बैठकीस जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनी घ्यावयाची काळजी : प्रतिबंधात्मक उपाय
·       पाणी साठे उघडे राहिल्यामुळे त्यावर डास बसून अंडी घालतात त्यानंतर साधारणत: 10 दिवसांनी डासांची निर्मिती होते. त्यामुळे घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवावेत.
·       शनिवार हा दिवस कोरडा म्हणून पाळावा. यामध्ये सर्व पाणी साठे कोरडे करुन कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावेत जेणेकरुन साठ्याच्या भिंतीला चिकटलेले डासांचे अंडे निघून जातात.
·       डास चावु नयेत म्हणून मच्छरदानी, डास पळवणारे धुप, वड्या, लिक्वीड, मलम यांचा वापर करावा. ही साधन उपलब्ध नसल्यास लिंबाच्या पाल्याचा धुर सर्व खोल्यामध्ये करावा.
·       हे डास दिवसा चावत असल्यामुळे लहान मुलांना अंगभर शर्ट व पॅन्ट घालावेत.
·       डास चावू नयेत म्हणून पंख्याचा वापर करावा.
·       घरावरील जूने टायर्स, फुटके डब्बे, नारळांच्या करवंट्या हे घराच्या छतावर असतील तर त्या काढून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होते. घरातील कुंड्या व कुलरमधील जूने पाणी काढुन टाकुन ताजे पाणी दररोज भरावे.
·       104 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन गावात साथरोग उदभवल्यास कळवावे जेणेकरुन तात्काळ उपाययोजना गावात सुरु होतील.
-*-*-*-*-



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा