गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर पथकाची नियुक्ती


         
          बीड, दि.2 :- संपूर्ण जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर पथकांची नियुक्ती करावी  असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  धनराज निला यांनी दिले.
          तंबाखू नियंत्रणाविषयीची जिल्हा समन्वय समितीची 5 वी बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एल. हरिदास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.जी.दबडगावकर, क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          जिल्ह्यामध्ये तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी करुन सर्व कार्यालय, शाळा, महाविद्यालयामध्ये तंबाखू मुक्तीचा संकल्प करण्यासंबंधीचा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या जिल्हा समन्वय समितीमध्ये घेण्यात आला. कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण व पोलिस विभागाची मदत घेऊन भरारी पथक स्थापन करुन विविध शाळा व कार्यालयांना भेटी देवून तपास करणार आहेत.
          सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू खाण्यास बंदी सर्व शासकीय कार्यालय, रुग्णालय व शाळा परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्यांवर 200 रुपये दंड आकारणे सुरु केले असून हा कायदा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आजपर्यंत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रशासनामार्फत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांकडून 12 हजार 500 रुपये एवढी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी इतर विभागांनी देखील जिल्हा रुग्णालय प्रशासनाप्रमाणे दंड आकारण्यास सुरुवात करण्यासंबंधीचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले आहे.
          या बैठकीत जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.पवन राजपुत, सुरेश दामोधर, ऋषिकेश शेळके यांचे सहकार्य लाभले. या बैठकीस विविध शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख, तालुका वैद्यकिय अधिकारी, विक्रीकर अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कृषी अधिकारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा