सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडून जिल्ह्यातील पिक परिस्थितीचा आढावा




बीड, दि. 21 :- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा खरीपाच्या सर्व पिकांना होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात मागील बऱ्याच दिवसापासून पाऊस न झाल्यामुळे त्याचा परिणाम पिकावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. नुकताच मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या पावसामुळे खरीपातील सर्व पिकांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पिक परिस्थितीचा आढावा घेवून पिकाची सद्याची स्थिती त्याच बरोबर पिक परिस्थितीची दर आठवड्याला अद्यावत माहितीचा अहवाल सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करुन जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणी टंचाई, प्रकल्पातील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, टंचाई निवारण कृती आराखडा, पेरणीचा अहवाल, रासायनिक खताची उपलब्धता, पिक विमा व पिककर्ज याबाबत सविस्तर आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या. तसेच महसूल व  इतर विभागाच्या रिक्त पदाचा आढावाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी घेतला.
गणेश उत्सावाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच जनतेला या उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी पदाधिकारी, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी संगणीकृत सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा