बीड दि.5 :- वस्तु आणि सेवा कर
म्हणजे जीएसटी करप्रणाली 1 जुलै पासून देशभरात लागू होत असून ही करप्रणाली भारतातील
अप्रत्यक्ष कराच्या क्षेत्रातील सुधारणांचे लक्षणीय पाऊल असून यामुळे उत्पादक आणि ग्राहक
या दोन्ही घटकांचा फायदा होणार आहे. असे प्रतिपादन औरंगाबाद येथील केंद्रीय उत्पादन
शुल्क आणि सेवाकर विभागाचे सहआयुक्त श्री. अशोक कुमार यांनी केले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय उत्पादन
शुल्क, सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे जीएसटी करप्रणाली
विषयी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जालना येथील व्हॅट विभागाचे उपायुक्त
एस.के. सोलंके, बीडचे सहाय्यक आयुक्त एस.टी. बोरकर तसेच नांदेडचे सहाय्यक आयुक्त धीरजकुमार
यांची प्रमुख उपस्थिती होती.
वस्तु व सेवा कर म्हणजे काय आहे
याबद्दल सविस्तर माहिती देताना अशोक कुमार पुढे म्हणाले की, ही करप्रणाली यापुर्वीच्या
अनेक प्रकारच्या अनेक पातळीवर भरावयाच्या करांच्या जागेवर आली आहे. ही करप्रणाली एकाच
छत्राखाली एकाच वस्तु व सेवेवर एकाच प्रकारे कर भरण्याची महत्वाची सुविधा देणार असल्यामुळे
उत्पादक घटकांना मोठी सुविधा होणार आहे. आपल्या व्यवसायाची विहित कालवधीत माहिती ऑनलाईन
भरणे आता अधिक सोपे, सरळ आणि फायदेशीर ठरणार आहे. यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि
उत्पादकांनी जीएसटी बद्दल भिती बाळगु नये. ही अधिक पारदर्शक व प्रामाणिक राहण्यासाठी
मदत करणारी प्रणाली आहे. ही करप्रणाली तिच्या पारदर्शकतेमुळे प्रशासकीय अंमलबजावणीसही
सोपी असेल असेही सहआयुक्त अशोक कुमार म्हणाले.
जालन्याचे सहाय्यक आयुक्त सोळंके
यांनही मनोगत व्यक्त केले. जीएसटी करप्रणाली सर्व ऑनलाईन सेवेद्वारे उपलब्ध असल्यामुळे
अधिकाधिक सोप्या पध्दतीने आणि अचुकपणे करदात्यांना कर भरणे शक्य होणार आहे असे सांगून
सोळंके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
औरंगाबाद येथील केंद्रीय उत्पादन
शुल्क, सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाचे अधिक्षक दिपक गुप्ता यांनी सादरीकरणाच्या सहाय्याने
जीएसटी विषयी सखोल मार्गदर्शन केले. जीएसटी मधील तरतुदी, कर निर्धारण, कर भरण्याची
पध्दत, ऑनलाईन विविरणपत्रे, नोंदणी तसेच विविध संकेतस्थळांचे पत्ते इत्यादी माहिती
सांगून उपस्थित सर्व उत्पादक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आणि कर सल्लागार, कर-आर्थिक
क्षेत्रातील मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकासमाधान केले. शहरातील
व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तालुकास्तरावर कार्यशाळा
बीड जिल्ह्यातील तालुक्याच्या स्तरावरही विक्रीकर विभागाच्यावतीने
वस्तु व सेवा कर विषयक कार्यशाळांचे आयोजन करुन व्यावसायिक व व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 6 मे रोजी
धारुर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात सकाळी 11 वाजता आणि केज येथे अनिल भोजनालयाचे
सभागृह येथे दुपारी 3 वाजता, 7 मे रोजी गेवराईच्या
सिंधी भवनात सकाळी 11 वाजता तर माजलगावच्या
राजस्थानी मंगल कार्यालयात दुपारी 3 वाजता कार्यशाळा होणार आहे. तसेच 8 मे रोजी सकाळी
11 वाजता आष्टी येथील हॉटेल यश येथे तर दुपारी 3 वाजता पाटोदा येथील रेणुका माता मंदीर हॉलमध्ये कार्यशाळा
होणार आहे. यानंतर 20 मे रोजी सकाळी 11 वाजता
अंबाजोगाईच्या नगर परिषद नाट्यगृहात आणि दुपारी 3 वाजता परळी येथील नगर परिषद नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत
सहभागी होऊन व्यापाऱ्यांनी जीएसटी बद्दल माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा