बीड, दि. 12:- पावसाळयाच्या काळात नैसर्गिक आपत्ती उदभवल्यास त्याचा सक्षमपणे
सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा नियोजनबध्द आराखडा तयार करावा तसेच नैसर्गिक
आपत्तीमुळे होणारी संभाव्य जिवीत व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा
सज्ज ठेवावी असे निर्देश प्र.जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांच्यावतीने जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मान्सुन 2017 पूर्वतयारी आयोजित बैठकीत
संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, शिवकुमार स्वामी, विकास माने, जिल्हा
पुरवठा अधिकारी राजेंद्र वाघ यांची व्यासपीठावर
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्र. जिल्हाधिकारी राम
गगराणी म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांवर
महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हा तसेच तालुकास्तरीय आराखडा
तात्काळ तयार करावा. या आराखडयामध्ये आपत्ती निवारणासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्री,
बचावाची उपकरणे यासारख्या सर्व महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात यावा. आपत्ती निवाणाच्या
कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तसेच महत्वाच्या यंत्रणांचे संपर्क
क्रमांकाची माहिती अद्यावत करुण्याची कार्यवाही करावी. संपर्कासाठी तयार करण्यात दुरध्वनी
क्रमांक जिल्हयातील प्रत्येक गावांच्या नागरिकांना तसेच तलाठी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात यावे. जेणेकरुन
अचानक उदभवलेल्या आपत्तीच्या प्रसंगी संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची तात्काळ संपर्क
साधाला जाईल. आपत्ती निवारणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करुन तेथे
प्रशिक्षित आणि जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात अशा सूचनाही
प्र.जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी यावेळी दिल्या.
वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून होणारी
जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विद्युत विभागाने वीज पुरवठ्यासंदर्भातील दुरुस्त्या
पावसाळापूर्वी पूर्ण कराव्यात. खराब झालेले विजेचे खांब किंवा लोंबकाळणाऱ्या तारा याची
दुरुस्ती तात्काह हाती घ्यावी. नादुरुस्त झालेल्या गाव तलाव व पाझर तलावाची जबाबदार
अधिकाऱ्यांमार्फत पहाणी करुन तपासणी करण्यात यावी व त्याची दुरुस्ती पावसाळयापूर्वी
करण्याची कार्यवाही करण्याच्याही सूचना प्र. जिल्हाधिकारी गगराणी यांनी यावेळी दिल्या.
जिल्हयातील महत्वाच्या धरण व प्रकल्पांवर सीसीटीव्ही कॅमेरे, दुरध्वनी यंत्रणा व बिनतारी
संदेश यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी.
असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपत्ती निवारणाशी संबंधित असलेल्या विद्युत, सार्वजनिक
बांधकाम, जलसंपदा, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा, नगर परिषद आदी विभागाच्या आपत्ती
निवारण कामांचा आढवा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण,
जिल्हा अपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिर्के यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय
अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा