गुरुवार, १८ मे, २०१७

खरीप हंगाम 2017-18 कृषी निविष्ठाधारकांनी कृषी निविष्ठा विक्रीबाबत शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी - निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी




          बीड, दि. 18 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येणारा खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने  जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे आणि किटकनाशके यांचा योग्य दराने व प्रमाणात पुरवठा करावा. तसेच शेतकऱ्यांची कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केली.
            कृषी विभाग आणि जिल्हा परिषद बीड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी बोलत होते.
            यावेळी बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. निला, औरंगाबाद येथील तंत्र अधिकारी दिलीप वडकुते, वजने व मापे विभागाचे श्री.दराडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे  आणि भारतातील इतर राज्यांसह महाराष्ट्रासाठीही खरीप हंगाम हा महत्वाचा हंगाम समजला जातो. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि किटकनाशके वेळेवर व योग्य प्रमाणात आणि दर्जेदार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशानाने योग्य नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कार्यवाही करावी. कृषी निविष्ठा  विक्रीच्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे. कृषी निविष्ठा विक्रीबाबत तक्रार आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगुन जिल्हयात 1 जून पासून खत विक्रीसाठी ई-पॉस मशीनचा वापर केला  जाणार असल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात यावे असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
            यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि किटकनाशके यांचा पुरवठा कृषी विभागामार्फत केला जातो. त्याचे योग्य  नियोजन केले असून जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निविष्ठा विक्रीबाबत सहकार्य करुन हा खरीप हंगाम यशस्वी करावा असे आवाहन केले.
            या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना तंत्र अधिकारी वडकुते म्हणाले की, कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बियाणे, खते आणि किटकनाशके यांच्या विक्रीचे परवाने नुतनीकरण करुन घ्यावे. साठा आणि भावफलक दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे दिसेल असा लावावा. खरेदीबाबतची देयके व अन्य कागदपत्रे जपून ठेवावीत. साठा नोंदवही दररोजच्या रोज अद्ययावत करावी व तसा अहवाल कृषी विभागास नियमित सादर करावा. तसेच मुदतबाह्य झालेली बियाणे, खते आणि किटकनाशके तसा शेरा लिहून स्वतंत्रपणे ठेवावीत त्याची कोणत्याही परिस्थिती विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून श्री. वडकुते यांनी यावेळी बियाणे अधिनियम, खते (नियंत्रण) अधिनियम आणि किटकनाशके अधिनियम याबाबत सविस्त मार्गदर्शन केले.
              माजलगावचे कृषी अधिकारी एस.जी. हजारे यांनी थेट लाभ हस्तांतरण (DBT), इ-पॉस मशीनद्वारे खत विक्रीची प्रक्रिया, कापुस पुरवठा-वितरण-विक्री-किंमत निश्चितीकरण अधिनियम याबाबत कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. निला यांनीही आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, कृषी निविष्ठाधारकांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बि-बियाणे, खते व किटकनाशकांचा मागणीप्रमाणे पूरवठा केल्यास त्या शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही.असेही त्यांनी यावेळी सांगितले. कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष तोतला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

            प्रारंभी कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी त्यांच्या प्रास्ताविकात प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाचा हेतू विषद करुन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी अधिकारी एस.डी. बनसोडे यांनी केले तर आभार कृषी अधिकारी अनिरुध्द सानप यांनी मानले. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा