सोमवार, १ मे, २०१७

पं.दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहिमेचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे





बीड, दि. 1 :- पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात 1 ते 27 मे दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहिम राबविण्यात येत असून याचा लाभ बीड जिल्ह्यातील जनतेने आवर्जून घ्यावा असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान शासनाच्यावतीने बीड जिल्ह्यासह राज्यातील सहा जिल्ह्यात राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत 1 ते 27 मे दरम्यान सर्व जनतेची नोंदणी करुन आरोग्य पूर्वतपासणी सर्वस्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या केंद्रात केली जाणार आहे. या अंतर्गत बीड येथील जिल्हा रुग्णालयातील नोंदणी कक्षाचे उदघाटन करुन पालकमंत्री मुडे यांच्या हस्ते अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपाध्यक्षा जयश्री म्हस्के, सभापती राजेसाहेब देशमुख, संतोष हांगे, शोभा दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य पुर्वतपासणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांचे आजार बरे करण्याची सुवर्णसंधी शासनाने उपलब्ध करुन दिली असल्याचे सांगून पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, मागील वर्षी आरोग्य विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविलेला महाआरोग्य शिबीराचा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. मोठ्या प्रमाणात रुग्णांचे आजार दूर करण्याची संधी मिळाली होती. शिबिर यशस्वी झाल्याने मोठ्या प्रमाणात कौतूकही झाले मात्र यावेळी शासन राबवित असलेल्या या आरोग्य पूर्वतपासणीत एकही रुग्ण सुटणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी. या तपासणीत आढळुन आलेल्या वीस प्रकारच्या आजारांच्या रुग्णांवर पुढील आवश्यक औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. असे सांगून या अभियानाला पंडीत दीनदयाल उपाध्याय योचे सार्थ नाव देण्यात आले आहे. पंडितजींच्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्याच्या अंत्योदय संकल्पनेची अंमलबजावणी या अभियानाच्या माध्यमातून होणार असल्याने प्रत्येकाने शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य पूर्वतपासणी करण्याचा निर्धार केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
समाजातील दारिद्रय,गरीबी दूर करण्यासाठी आपले प्राधान्य असून आरोग्य अबाधित राखावयाचे असेल तर स्वच्छतेला महत्व दिले गेले पाहिजे.जोपर्यंत शंभर टक्के शौचालय बांधकाम व हागणदारीमुक्त गावे होणार नाहीत तोपर्यंत अशा आरोग्याच्या अडचणी वाढत राहतील. जिल्ह्यातील जास्तीत जासत गावे हागणदारीमुक्तीच्या संकल्प करतील व संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच पालकमंत्री मुंडे यांनी यादृष्टीने अधिकाऱ्यांबरोबरच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादन केली.
जिल्ह्यातील सर्व शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ आणि सुंदर होतील यादृष्टीने उपक्रम राबविण्याची सुचना करुन पालकमंत्री मुंडे यांनी यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले. याशिवाय त्यांनी सामान्य रुग्णालयाच्या वाढीव खाटांच्या इमारतीचा व इतर अनुषंगिक प्रश्नांविषयी आपण जागरुक असल्याचे सांगून लवकरच प्रश्न निकाली काढण्यात येईल असे स्पष्ट केले.
योवळी बोलतांना नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंग यांनी यापूर्वी चंद्रपुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना दहा महिन्यात दहा तालुके हागणदारीमुक्त केल्याच्या उपक्रमाची माहिती देवून पुढील काळात बीड जिल्ह्यातही विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचा व त्यासाठी पुढाकार घेण्याचा मनोदय व्यक्त केला. बीड जिल्ह्याची मानवविकास निर्देशांक, साक्षरता दर आणि आरोग्य क्षेत्रातील विकासामध्ये असलेली पिछाडी चिंताजनक असून भविष्यात आपण याविषयी अधिक जागरुकपणे काम करु असेही ते म्हणाले.

यावेळी जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार यांनीही आपल्या भाषणात आरोग्य पूर्वतपासणी मोहिम जिल्ह्यात यशस्वी करण्याचे आवाहन केले. प्रारंभी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी प्रास्ताविकात अभियानाची माहिती दिली. या समारंभास रमेश पोकळे, राजेंद्र म्हस्के, वसंत मुंडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा