सोमवार, १ मे, २०१७

महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन साजरा सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे







बीड, दि. 1 :- बीड जिल्हा हा कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी प्रयत्नशील असल्याची निसंदिग्ध ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्ह्याच्या विकासाचा मागोवा घेतांना पालकमंत्री मुंडे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षातील दुष्काळी परिस्थितीनंतर गतवर्षी झालेला पुरेसा पाऊस आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीला गती देणारा ठरत आहे. यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई व चारा टंचाई सारखे संकट नसल्याने अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. सामान्य जनता आणि शेतकरी हे  दोन्ही घटक समाधानी आहेत. पावसामुळे निर्माण झालेले शाश्वत पाणीसाठ्याचे श्रेय हे आपल्या सरकारने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला जाते. आता आपण दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करु लागलो आहेत याचा मला अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या.
गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन  प्राधान्य देत असल्याचे सांगून पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शबरी आणि पारधी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 4 हजार 65 घरकुलाची कामे सुरु झाली. याशिवाय राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेखाली 2 हजार 627 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठीही विशेष योजना राबविण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करुन गटाच्या मजबुत बांधणीचे काम होत असल्याचे त्या म्हणाल्या.
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाची माहिती देवून पालकमंत्री मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य रस्ते मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेग वाढणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकास, स्मार्टग्राम योजना, वृक्षलागवड मोहिम, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान आदि विषयांवरील माहिती देवून त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री मुंडे यांनी उघड्या जीपमधून पोलीस दलाच्या विविध पथकांचे निरीक्षण केले. पोलीस दल, गृहरक्षक दल, आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या पथकांनी परेड संचलन करुन मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते स्मार्टग्राम योजनेतील ग्रामपंचायतींचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये चिंचवण ता.वडवणी, मस्साजोग ता.केज, पाथरवाला ता.गेवराई, गुंदेवाडी ता.बीड, लवुळ ता.माजलगाव, चाटगाव ता.धारुर, कुसळंब ता.पाटोदा, शेरी (ब्रु) ता.आष्टी, बावी ता.शिरुर, सनगाव ता.अंबाजोगाई, टाकळी देशमुख ता.परळी वैजनाथ या ग्रामपंचायतीचा समावेश होता. यावेळी महसूल विभागातर्फे देण्यात येणारा आदर्श तलाठी पुरस्कार फुलसांगवी ता.शिरुर येथील तलाठी बी.बी.बडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस दलातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्यावतीने सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी व नागरिकांची भेट घेतली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री म्हस्के, सभापती राजेसाहेब देशमुख, शोभा दरेकर आदि मान्यवर पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यसेनानी, मान्यवर नागरिक आणि अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन गणेश धस आणि अभिमन्यू औताडे यांनी केले.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा