गुरुवार, २५ मे, २०१७

दुय्यम निरीक्षक परीक्षा 13 उपकेंद्रावर; केंद्र परिसरात 144 कलम लागू


                   
          बीड, दि. 25 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पुर्व) परीक्षा-2017 बीड जिल्हा केंद्रावर रविवार दि.28 मे 2017 रोजी एकुण 4 हजार 296 उमेदवारांची परीक्षा घेण्याचे निश्चित आहे. त्यानूसार 13 उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राचे परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.

          परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी सोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परीसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे प्रसंग निर्माण झाल्यास केंद्र प्रमुख,  पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अडचणीचे होईल. भगवान विद्यालय, चंपावती माध्यमिक विद्यालय, संस्कार विद्यालय, मिल्लीया कला व विज्ञान (मुलांचे) महाविद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कुल, शिवाजी विद्यालय, बलभीम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्नीक, मिल्लीया गर्ल्स हायस्कुल, स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालय, डॉ.बापुजी साळुंके हायस्कुल, श्री.छत्रपती शाहु माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे की परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा पेपर संपेपर्यंत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र  येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मिटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे तसेच वेळेअभावी हा आदेश प्रत्येक इसमावर तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश देण्यात आला आहे. असे बीडचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा