बीड, दि. 3 :- येत्या 8 मार्च रोजी साजरा करण्यात येणाऱ्या
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना लोकशाही प्रक्रीयेमध्ये सामावून घेण्यासाठी
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महिला मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
असल्याची माहिती बीडचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.
महिला दिनानिमित्त महिला मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी
करुन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुचित केले आहे. या
पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर्वतयारी बैठकीत गणेश निऱ्हाळी बोलत
होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार छाया पवार, महिला व बालकल्याण
अधिकारी कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी निवडणूक प्रक्रीयेमध्ये
मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 2009 पासून
स्वीप कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण मतदारांसह युवक,
महिला, आदिवासी, तृतियपंथी, स्थलांतरीत कामगार अशा इतर मतदारांना लोकशाही प्रक्रीयेमध्ये
सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून महिला दिनी महिला
मतदारांची मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करुन घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याची
भारत निवडणूक आयोगाने सुचना केली आहे असे सांगून उपजिल्हा निवडणूक अधिकारी निऱ्हाळी
यांनी सविस्तर सूचना दिल्या.
प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास
प्रकल्प अधिकारी यांनी संयुक्तपणे कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमानिमित्त महिलांना
मतदार यादीत नांव नोंदविण्याची कार्यवाही प्रत्येक मतदार केंद्रावर केली जाणार आहे.
तसेच जनजागृती करुन मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम
महिला दिनी दुपारी 12 वाजता सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात होणार आहे. त्याच्या नियोजना
संदर्भात निऱ्हाळी यांनी बैठकीत संबंधित विभागांना सूचना दिल्या. या कार्यक्रमामध्ये
अंणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदींचा सहभाग जास्तीत जास्त राहिल याचा प्रयत्न करण्यात
यावा. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थिंनींचाही सहभाग राहिल याची दक्षता घ्यावी असेही
यावेळी सूचित करण्यात आले.
प्रत्येक गावातील
नवीन महिला मतदारांची नांव नोंदणी करतानांच गाव सोडून गेलेल्या महिला मतदारांची नांवे
कमी करण्याचीही कार्यवाही करण्याची सुचना यावेळी देण्यात आली.
-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा