बीड, दि.6 :- उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात
कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी मोबाईल व्हॅन
पाठवली असून दि.27 मार्च 2017 पर्यंत जिल्ह्यातील विविध गावामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे
कायदेविषयक जनजागृती व लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. न्याय आपल्या दारी या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष
न्यायालय जनतेच्या दारामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे जाऊन पोहोचणार असून ग्रामीण भागातील
नागरिकांसाठी या माध्यमातून विविध कायदेविषयक बाबींची माहिती सांगितली जाणार आहे.
शुक्रवार दि.3 मार्च 2017 रोजी बीड मुख्यालयात
बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनचे उदघाटन करण्यात
आले. यावेळी मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मंगेश
पोकळे, जिल्हा सरकारी वकील ॲड.ए.डी.राख व इतर कर्मचारी उपस्थित होते. मोबाईल व्हॅनला
हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आली. दि.27 मार्च पर्यंत ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील
विविध ठिकाणी दाखल होणार असून न्यायीक अधिकारी व विधीज्ञ यांच्यामार्फत लोकांमध्ये
कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
मोबाईल व्हॅन शिबीर दि.5 व 6 मार्च रोजी
वडवणी येथे होते आता दि.7 व 8 मार्च रोजी धारुर, दि.9 व 10 मार्च रोजी केज, दि.14 व
15 मार्च रोजी अंबाजोगाई, दि.16 व 17 मार्च रोजी परळी, दि.18 व 19 मार्च रोजी माजलगाव,
दि.20 व 21 मार्च रोजी गेवराई, दि.22 व 23 मार्च रोजी आष्टी, दि.24 व 25 मार्च रोजी
पाटोदा, दि.26 व 27 मार्च रोजी शिरुर या प्रमाणे तालुका विधी सेवा समितीमार्फत त्या
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शिबीर व लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. असे बीडचे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा