बीड, दि. 8 :- महिलांना सामाजिक आणि आर्थिक समानता देणे ही
काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती इतर क्षेत्रात चांगले काम
करण्याबरोबरच स्वत:च्या घराचा आधार बनुन आपल्या कुटूंबाच्या आणि देशाच्याही उन्नतीमध्ये
भरीव योगदान देऊ शकते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन परिसरातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी नवल
किशोर राम यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे,
उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार छाया
पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह सोळंके,
पोलीस उप अधीक्षक अंजूम शेख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, महिला व बाल विकास
अधिकारी आर.डी.कुलकर्णी, पॅरा ऑलिंपीक विजेती खेळाडू कोमल बोरा, डॉ. जयश्री बांगर,
डॉ. प्रतिभा पवार, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. सुरेखा माने, यांची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, महिलांपेक्षा
पुरुष प्रत्येक बाबतीत अग्रेसर आणि सक्षम आहेत अशी समाजामध्ये पुर्वापार चालत आलेली
मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्यांनी पुरुषांबरोबरच किंवा
काही वेळा पुरुषांपेक्षाही चांगली कामगिरी करुन दाखविण्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर
आहेत. त्यामुळे महिलांना सामाजिक आणि आर्थिक समानता देणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी
यावेळी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांची अंमलबाजवणी
प्रभावीपणे होण्यासाठी यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मकपणे काम करण्याची
गरज आहे असे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, आज गावपातळीवर आशा कार्यकर्ती आणि
अंगणवाडी पर्यवेक्षक आणि सेविका यांनी महिलांसाठीच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी
विशेष प्रयत्न करावेत असे सांगितले.
बीड जिल्हयात स्त्री-पुरुष जन्माचे प्रमाण हे व्यस्त आहे.
त्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्त्रीभ्रुण हत्या आणि
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी असे जिल्हाधिकारी
राम यांनी सांगितले.
महिलांना शंभर वर्षांपूर्वी कोणत्याही देशात मतदान करण्याचा
हक्क नव्हता. महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी आंदोलने करण्यात आली त्यानंतर महिलांना
मतदानाचा हक्क मिळाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याने
आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर ज्या महिलांचे नांव
मतदार यादीमध्ये नाही ते यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष मोहिम
राबविण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे म्हणाले की, आजही कुपोषित, कमी वजनाची
आणि खुजी बालके जन्माला येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता आहे. त्यामुळे
सर्वांनी हागणदारी मुक्त गावाचा संकल्प करावा. प्रत्येकाने शौचालये बांधून त्याचा वापर
केल्यास अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई दूर होऊन गावाचे वातावरण निरोगी आणि स्वच्छ राहण्यास
मदत होईल.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पॅरा ऑलिंपीक विजेती खेळाडू कोमल
बोरा आणि डॉ. प्रतिभा पवार यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
गावातील अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अंगणवाडी सेविकेचाही यावेळी
सत्कार करण्यात आला. तसेच ज्या बचतगटांनी घेतलेले कर्ज मुदतीत भरले अशा बचतगटाच्या
महिलांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक विभागाच्यावतीने सात महिलांना मतदार
ओळखपत्राचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाने महिला दिनाचे औचित्य साधून महिला मतदारांची
नाव नोंदणी करण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात सर्व
एलबीओ आणि मतदान केंद्राच्या माध्यमातून महिला मतदारांची नांव नोंदणी करुन मतदारयादीत
समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
यांनी मतदार जनजागृती उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादन
केली.
यावेळी डॉ. जयश्री बांगर, डॉ. सुरेखा माने, साधना गंगावणे,
संध्या दुबे आणि डॉ. महात्मे यांनी महिलांशी संबधित विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश सावंत यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी लिंबाळकर यांनी
मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षीका, सेविका, आशा कार्यकर्ती
यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा