बुधवार, १ मार्च, २०१७

नवनिर्वाचित सदस्यांसाठी जात पडताळणी समितीची विशेष मोहिम


                   
          बीड, दि. 1 :- शासन अधिसुचनेप्रमाणे आरक्षीत जागेवर निवडुन आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगरपालिका सदस्यांना निवडून आल्याचे घोषित केल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.  बीड जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्र प्राप्त करुन जात वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे अर्ज सादर केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र विहीत वेळेत प्राप्त व्हावे यासाठी संबंधित अर्जदार सदस्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी पडताळणी समितीकडून विशेष मोहिमेचे आयोजन दि.2 व 3 मार्च 2017 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. 
          प्रकरणे विहीत वेळेत निकाली काढण्यासाठी उमेदवारांनी  निवडुन आल्याबाबत जाहीरनामा, निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाची प्रमाणित प्रत दाखल करावी. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी त्यांच्याकडे असलेले जातीचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी/ उपजिल्हाधिकारी) यांच्याकडून निर्गमित झाले असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. विवाहित स्त्री सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्रामध्ये (Daughter of) वडीलांच्या नावांचा उल्लेख असणे आवश्यक आहे.  तसे असल्याची खात्री करावी. चुकीचे जात प्रमाणपत्र विचारात घेतले जाणार नाही.
          समितीकडे दाखल केलेल्या प्रकरणामध्ये निवडणुक कामासाठी विहीत नमुन्यातील शंभर रुपयाच्या स्टँप पेपरवरील दोन स्वतंत्र शपथपत्रे दाखल करणे अनिवार्य आहे.  ज्या अर्जदारांनी शपथपत्र जोडले नसतील त्यांनी 2012 चे नियमांमध्ये नमुद केल्याप्रमाणे नमुना क्र.3 व नमुना क्र.21 मधील शपथपत्रे दाखल करावीत. अनुसूचित जातीसाठी सन 1950 पुर्वीचा, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी सन 1961 पुर्वीचा व इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री/ पुरुष) सन 1967 पुर्वीचे महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरुपी वास्तव्याचे व जातीचे पुरावे दाखल करणे आवश्यक आहे.  अर्जदारांनी रक्तनातेसंबंधातील व्यक्तीचे उदा- वडील, सख्खे चुलते, आत्या, आजोबा यांचे शाळा सोडल्याचे दाखले, जन्मनोंदी, गांव नमुना नं.14, वारस हक्कपत्रक, 7/12 उतारा इत्यादी आवश्यक ती कागदपत्रे ज्यामध्ये जातीच्या नोंदी झालेल्या आहेत असे महसुली पुरावे प्रमाणित प्रतींसह सादर करावेत. अर्जदारांनी कागदपत्रे स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयात येऊन दाखल करावीत.

         बीड जिल्ह्यातील सक्षम प्राधिकारी यांच्याकडील जात प्रमाणपत्र असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रकरणांचा कालबध्द पध्दतीने निपटारा करावयाचा असल्याने निर्वाचित सदस्यांनी कागदपत्रांसह (यापूर्वी दाखल केलेली कागदपत्रे वगळून) समिती कार्यालयाकडे विहीत मुदतीत संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची करावी, सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे  बीड जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त ए.एम.शेख यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा