बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

निवडणूक काळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


            बीड, दि. 8 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कालावधीत बीड जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
            बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून आज झालेल्या विशेष बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            निवडणूक कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी राम यांनी सर्व उपविभाग व तालुकानिहाय प्रत्येक कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे 63 प्रकरणात जिल्ह्यात कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात 1297 शस्त्र परवानाधारक असून 1165 शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेली आहेत. उर्वरित शस्त्रे जमा करण्यात येत आहेत. कलम 107 च्या 440, कलम 109 च्या 56, व कलम 110 च्या 42 प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच कलम 144 नुसार 63 प्रकरणात कार्यवाही झाली आहे. कलम 56 अन्वये 70 आणि कलम 57 अन्वये 29 हद्दपारीची प्रकरणे निर्णयस्तरावर आहेत. मुंबई दारुबंदी अधिनियम अंतर्गत कलम 93 ची 9 प्रकरणे असून त्यावर कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
            कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या हद्दपारीच्या प्रकरणांबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. आवश्यकतेप्रमाणे संबंधितांना नोटीस निर्गमित करावेत. हद्दपार केलेल्या लोकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी दोन तासाचा कालावधीसाठी मतदानासाठी गावात येण्याची मुभा देण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिली.
            निवडणूकीच्या  मतदान काळात विशेष पोलीस बंदोबस्त आवश्यक असणार असून मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी जादा सुरक्षा व्यवस्था राहील. आवश्यकत्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरा पथक, सीसीटीव्ही यंत्रणा सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिले.
            मतदान केंद्राच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलीस कर्मचारी तैनात करतांना वाढीव लागणारी पोलीस पथकांची कुमक आणि राज्य राखीव पोलीस दल व इतर मनुष्यबळाच्या गरजेचा आराखडा तयार करण्यात यावा असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी मतदान केंद्रनिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. याशिवाय मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेऊन उपयुक्त सूचना देण्यात आल्या.
            या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) राजेंद्र वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, डॉ. हरी बालाजी, वैभव कलुबर्मे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा