बीड, दि.
1 :- तंबाखुची साथ हे मानवावर आलेले मोठे संकट
असून ते टाळता येण्यासारखे आहे. तंबाखु सेवनामुळे
आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना तंबाखु सेवनापासून परावृत्त
होण्यासाठी तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीची तिसरी बैठक जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात तंबाखु सेवन मनाई करणारे फलक
लावणाच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. व्यसन करणाऱ्या नागरिकांस कायद्याने दंडात्मक
कारवाई करण्याचे अधिकार सर्व संस्था प्रमुखांना व अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले
असून त्यांचा वापर करावा. शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून 100 यार्ड परिसरात
तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्यावर कडक कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. जिल्ह्यातील
प्रत्येक शाळेने तंबाखु विरोधी फलक लावणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन होत असल्यास
कारवाई करण्याचे निर्देश श्री.राम यांनी यावेळी दिले. यासाठी जिल्हा अंतर्गत सर्व
कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना भरारी पथकाद्वारे अचानक भेटी देवून तपासणी करण्याचा
मानसही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी
गणेश गावडे, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुलक्षणा जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल
आलुरकर, शिक्षणाधिकारी, तालुकास्तरीय वैद्यकिय अधिकारी व वैद्यकिय अधिक्षक इत्यादी
समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. तंबाखु नियंत्रणाच्या उपक्रमाबद्दल दृकश्राव्य
चित्रफितीचे सादरीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. सत्येंद दबडगावकर यांनी केले. असे बीडचे
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा